Sat, Jul 04, 2020 10:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात २४ तासात तब्बल ८ हजार ३८१ जणांचा कोरोनावर विजय!

राज्यात २४ तासात तब्बल ८ हजार ३८१ जणांचा कोरोनावर विजय!

Last Updated: May 30 2020 2:01AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8 हजार 381 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यातील सर्वाधिक  7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या 2682 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यातील बाधितांची संख्या ही 62 हजार 228 झाली आहे. 33 हजार 124 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 62 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 35 हजार 467 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.  35 हजार 967 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11 दिवस होता तो आता 15.7 दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  43.38 टक्के एवढे आहे.

राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे. शुक्रवारी राज्यात 116 कोरोना  बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी मुंबईत 38, ठाणे 1, भिवंडी 3, नवी मुंबई 9, रायगड 2, मीरा-भायंदर 3, पनवेल 1, कल्याण डोंबिवली 1, जळगाव 17, नाशिक 3, मालेगाव 5, धुळे 7), पुणे मनपा 13,सोलापूर 3, कोल्हापूर-3, औरंगाबाद- 5, अमरावतीमध्ये 2 मृत्यू झाले आहेत. मृत्यूंपैकी 77 पुरुष तर 39 महिला आहेत.  दरम्यान, मृतांची एकूण संख्या 2098 इतकी झाली आहे. 

मुंबईत 1437 नवीन रुग्णांची भर; 38 जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईकरांसाठी गुडन्यूज असून आतापर्यंत 16 हजार 8 रुग्ण बरे होऊन घरी परतले. शुक्रवारी 1437 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 36 हजार 717 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 38 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत बरे होणार्‍या रुग्णांचा आकडा 16 हजारांवर पोहोचल्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता 20 हजार 702 इतकी आहे. महापालिका व सरकारी लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दिवसभरात 1437 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.