Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातली काँग्रेस शरद पवारच चालवतात

राज्यातली काँग्रेस शरद पवारच चालवतात

Published On: Apr 06 2019 1:47AM | Last Updated: Apr 06 2019 1:37AM
मुंबई : खास प्रतिनिधी

महाराष्ट्रातला काँगे्रस पक्ष अत्यंत गलितगात्र झालेला असून तो राष्ट्रवादीची बी टीम बनला आहे. शरद पवारच राज्यातल्या काँग्रेसबद्दलचे सगळे निर्णय घेत आहेतर, त्यामुळे काँग्रेससोबतच राष्ट्रवादी हा आमचा प्रमुख विरोधक आहे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी अनेक धक्कादायक विधाने केली आहेत. तिहार जेलमधील एका आरोपीमुळे अनेकांची झोप उडाल्याचे विधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते. प्रधानमंत्र्यांनी हा प्रफुल पटेल यांच्याकडे केलेला इशारा आहे काय? असे विचारले असता, मोदी यांनी ही धमकी दिलेली नाही, माहिती दिली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मोदी हे कुणाला घाबरत नाहीत, वा धमकीदेखील देत नाहीत, सरळ कारवाई करून मोकळे होतात, असे ते म्हणाले. काही पकडले गेलेले काही मध्यस्थ तिहार जेल मध्ये आहेत. त्यांच्याकडून राष्ट्रवादीच नव्हे, काँग्रेसच्या नेत्यांबद्दलही बरीच माहीती मिळत असून ती बाहेर येणारच आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

भाजपाकडे बोलण्यासाठी अन्य काही उरले नसल्याने आता हे माझ्या नसलेल्या गृहकलहाबद्दल बोलत आहेत, या पवार यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता पवारांच्या घरातील गृहकलहाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र बोलत असताना निवडणुकीच्या प्रचारात ती गोष्ट येणारच असे सांगताना आमच्याकडे पवार यांच्या विरोधात बोलण्यासाठी तेवढी एकच गोष्ट नाही, अन्य अनेक गोष्टी आहेत. यापुढे त्या प्रचारात येतीलच, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

बारामती मतदारसंघात भाजपा आधी फारसे गंभीरपणे लढत नव्हती. पण निवडणुक प्रचारात कोणतेही फिक्सींग करायचे नसल्याने आम्ही कमळ या चिन्हावर यावेळी लढत आहोत. गेल्यावेळीही महादेव जानकर आमच्या विन्हावर लढले असते, तर निकाल वेगळा लागला असता, तसा तो यावेळीही लागेल, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.