Sun, May 31, 2020 15:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘महा’सर्वेक्षण: सत्तेच्या राजकारणाची समीकरणे बदलणार

‘महा’सर्वेक्षण: सत्तेची समीकरणे बदलणार

Published On: May 04 2018 10:31AM | Last Updated: May 04 2018 6:21PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पुढारीने राज्यात केलेल्या या सर्वेक्षणात विचारले गेलेले दोन प्रश्‍न ज्वलंत मुद्द्याचे होते. त्यावर महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेली उत्तरे अंतर्मुख करणारी आहेत. ‘राज्य सरकार कोणत्या प्रश्‍नावर अपयशी ठरले’ या प्रश्‍नावर शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी या प्रश्‍नांना अनुक्रमे 53 आणि 50 टक्के मते मिळाली. म्हणजे या दोन प्रश्‍नांवर फडणवीस सरकार अपयशी ठरले, असा महाराष्ट्राचा ठपका आहे आणि हा ठपका केवळ ग्रामीण महाराष्ट्राचा नाही, तर शहरी मतदारदेखील आपली नाराजी व्यक्त करण्यात तितकाच पुढे दिसतो. महिला अत्याचाराबद्दल 41 टक्के मतदार नाराज आहेत. सामाजिक सलोखा राखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे 21 टक्के मतदार सांगतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार कमी पडले, असे 31 टक्के मतदारांना वाटते. या मतांचा विचार करता शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी हे दोन प्रश्‍न प्रामुख्याने भाजपला नडतील, असे निष्कर्ष निघू शकतात.

शेतकर्‍यांचे प्रश्‍न मुख्य मुद्दा ठरतील, असे सर्वाधिक 50 टक्के मतदारांना वाटते. 41 टक्के मतदारांनी प्रभावी मुद्दा म्हणून मराठा मोर्चाची निवड केली. त्याखालोखाल 38 टक्के मतांसह नोटाबंदी प्रभावी मुद्दा म्हणून पुढे आला आहे. विधानसभेच्या रिंगणात कोरेगाव भीमा दंगलीचा मुद्दा प्रभावी ठरेल, असे 23 टक्के मतदारांना वाटते. निवडणुकीच्या रिंगणात जातीपातींची घुसळण करण्यास तो पुरेसा समर्थ ठरू शकतो.

यातून निवडणूक राजकारणाला काही नव्या पाऊलवाटा फुटताना दिसतात. विधानसभा अन् लोकसभा निवडणुकांचे मुद्दे वेगळे असतात, हा कालपर्यंतचा समज आता काही प्रमाणात का होईना, बदलावा लागेल. गल्ली ते दिल्ली एकाच पक्षाचे सरकार असण्याचा तर हा परिणाम नसावा? एकपक्षीय राजवटीमुळे जे दिल्लीत गाजेल, तेच गल्लीत नांदेल. 

सत्तेच्या राजकारणाची समीकरणे बदलणारा कौल

> लोक सरकारवर नाराज आहेत; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूश आहेत. हातात अजून एक वर्ष आहे, असे म्हणणे धाडसाचे होईल; परंतु जो काही काळ हाती शिल्लक आहे, त्या काळात मुख्यमंत्री आपल्या सरकारवरील नाराजी कशी दूर करतात, हा कळीचा प्रश्‍न ठरेल. भाजपच्या सरकारवरच जनता बहुमताने नाराज
असल्याने विधानसभेच्या रिंगणात भाजपला स्वबळावर रिंगणात उतरणे परवडणार नाही. सोबत मित्रपक्ष लागतील. शिवसेना सोबत येते की स्वबळाची तिरंदाजी करते, यावर भाजपचे यशापयश कमी-अधिक होणे अवलंबून असेल. मतदारांनी भाजपनंतर राष्ट्रवादीला पसंती दिली आहे.

> भावी मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांना 9 टक्के पसंती महाराष्ट्राने दिली, तर 6 टक्के मतदारांना राज ठाकरे मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. त्यातही तरुण मतदारांनी 9 टक्के मतांचे वजन राज यांच्या बाजूने टाकले आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, मुख्यमंत्रिपदासाठी दिलेल्या यादीत सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांची नावे असूनही त्यांना ना तरुणांची पसंती ना महिलांची. या दोघी नेत्यांना प्रत्येकी 5 टक्के पसंती मिळाली, तेथे एक टक्का जादा मते घेऊन राज पुढेच आहेत. त्यांना कोण सोबत घेतो, हे बघायचे!

वाचा : ‘महा’सर्वेक्षणाचे इन्फोग्राफिक्स: आता निवडणूक झाली, तर...

वाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: लोक सरकारवर नाराज; पण...

वाचा : ‘महा’सर्वेक्षण: ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो!’

वाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: आता फडणवीस फॅक्टर! 

वाचा : युती-आघाडीचे राजकारण अटळ! पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण 

वाचा जनतेच्या मनाचा ठाव घेणारा व्यापक सर्व्हे : डॉ. योगेश जाधव 

Tags : survey2018, Kaul Marathi Manacha, daily pudhari, abp majha, survey, maharashtra, politics, Maha Sarvekshan