Sun, May 31, 2020 15:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘महा’सर्वेक्षण: ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो!’

‘महा’सर्वेक्षण: ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो!’

Published On: May 04 2018 10:14AM | Last Updated: May 04 2018 10:25AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

‘राजकीय पक्ष आणि त्यांच्या कृतींचे प्रतिबिंब जनमत चाचण्यांत उमटत असते.’ जनमत चाचण्यांविषयीचे हे सार्वकालिक वचन आहे. ‘पुढारी’ने राज्यात केलेल्या व्यापक सर्वेक्षणात पडलेल्या प्रतिबिंबाचा विचार सत्तारूढ, विरोधी पक्ष व उभयतांचे नेते यांनी वरील वचनाच्या चौकटीत करावा. तो तसा झाला, तर त्यांना जनमत असे का व्यक्त झाले आहे, हे अधिक समजून घेता येईल. सर्वाधिक पसंतीच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अग्रभागी का आहेत? ‘जलयुक्त शिवार’ नावाजले जात असताना ‘सेवा हमी कायदा’ फ्लॉप का आहे? ‘शेतकरी आत्महत्यां’चा विषय चिंताजनक वाटत असताना ‘ई-गव्हर्नन्स’च्या अंमलबजावणीत सरकारचे अपयश फार ठळकपणाने का पुढे येत नाही? या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरे सरकारच्या आणि विरोधकांच्या कृतीवरून जनमताच्या पाहणीत प्रतिबिंबित झाली आहेत.

महाराष्ट्रात 2014 पूर्वीच्या चारही सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री होता. या सरकारमध्ये तो नाही. राज्याचा एकमेव आणि निर्विवाद चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसच पुढे आले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींच्या बरोबरीने प्रचारसभा आणि नंतर महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा निवडणुकांत राज्यभरात प्रचार करीत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला यश मिळवून दिले आणि ‘फडणवीस फॅक्टर’ महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आणला. त्याचे प्रतिबिंब या पाहणीत दिसते आहे. सर्वाधिक टीका आणि बदनामीचे धनी निर्विवादपणाने अजित पवार होते. महाराष्ट्रात लागोपाठ पराभव स्वीकारल्यानंतर आरोपांच्या भडिमारातही मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा म्हणून फडणवीसांनंतर अजित पवार यांचे नाव समोर येणे, हे आश्‍चर्यच आहे. तथापि, पक्षपातळीवर सर्वाधिक आंदोलने करून रस्त्यावरील असंतोष संघटित करीत जनतेत प्रमुख विरोधी पक्ष ही प्रतिमा उभी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. याउलट, सत्तेत राहून विरोधकाची भूमिका बजावणारी शिवसेना आणि सरकार विरोधातील मुद्दे तापवत जनआक्रोश उभा करण्यासाठी फारसे हातपाय हलवताना न दिसलेला काँग्रेस पक्ष या दोघांच्या कृतीचे स्पष्ट चित्र या पाहणीत उमटलेले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात बिनीची भूमिका बजावणार्‍या काँग्रेस व शिवसेना या पक्षांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीने पुरेसे मागे सोडल्याचे हा आरसा दाखवितो.

माध्यमे मते व्यक्त करीत असतानाच जनामनांत काय सूर आहे, त्याचाही वेध घेतच असतात. बर्‍याचदा मतभिन्नता असू शकते; परंतु जेव्हा पाहणी करून आकडेवारीतून वास्तव समोर येते, ते कठोर आणि नागवे असते. ते नाकारणे म्हणजे स्वतःच्या मनाची फसगत करण्यासारखे असते. म्हणूनच ही महाराष्ट्रव्यापी पाहणी राजकीय पक्षांना काही मुद्द्यांवर समाधान देणारी असेल. दुसर्‍या मुद्द्याबाबत चिंतन करायला भाग पाडणारी आहे.

संविधान धोक्यात आहे, दलित-मुस्लिम असुरक्षित आहेत, अशा प्रचाराच्या प्रचंड गदारोळातही सामाजिक सलोख्याचा मुद्दा सरकारच्या पहिल्या पाच अपयशाच्या मुद्द्यांत नाही, याबद्दल सुस्कारा टाकायचा की महिला अत्याचार आणि बेरोजगारी हे मुद्दे पहिल्या तीन अपयशांत मोडतात याचे चिंतन करायचे, हा निर्णय भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांना घ्यायचा आहे. ‘उद्योगांना प्रोत्साहन देण्यास कमतरता’ हा मुद्दा लोकांना प्रकर्षाने भेडसावत नाही, याचा आनंद मानावयाचा की शेतकरी आत्महत्या हा मुद्दा क्रमांक एकचा आहे, याबाबतीत तातडीने ठोस पावले उचलायची, याचा निर्णय सत्तारूढ पक्षानेच घ्यायचा आहे. 

मराठा मोर्चे हा मुद्दा लोकांना सर्वात प्राधान्याचा का वाटतो आणि तुलनेत कोरेगाव भीमा खाली का गेलेला आहे, याचे उत्तर विरोधकांना शोधावे लागेल. मराठा मोर्चे शांततेने निघाले. त्यामुळे त्याचे अपील पोचले. कोरेगाव भीमाचा मुद्दा राजकीय नाही, हे पूर्णपणे पटविण्यात कदाचित विरोधी पक्ष अपयशी ठरले असावेत, असे जनतेला वाटत असावे. जनता ‘समस्या आणि राजकारण’ याची फारकत करू शकते, हाही अर्थ यातून प्रतिबिंबित होताना दिसतो.

प्रभावी मंत्र्यांच्या यादीत फडणवीस, चंद्रकांत  पाटील आणि पंकजा मुंडे आघाडीवर आहेत आणि बाकीचे मंत्री विशेषतः शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी फक्त रामदास कदम यांचा ठळक उल्लेख सोडला, तर अन्य कोणताही मंत्री ठसा का उमटवू शकला नाही, याचा शोध शिवसेनेला आपल्या परस्परविरोधी भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर घ्यावा लागेल. तर काँग्रेसला अद्याप पृथ्वीराज आणि अशोक चव्हाण यांच्यानंतरचे प्रभावी नेतृत्व सापडलेले आहे, असे जनतेला वाटत नाही आणि राज ठाकरेंना अद्यापही महाराष्ट्राचा राज्यकर्ता या भूमिकेत बघण्यासाठी जनता तयार नाही, हाही या पाहणीचा अर्थ आहे.

सरकारच्या कामगिरीबाबत गुण देताना सुमार आणि चांगले या दोन गटांत जनमत साधारणपणाने समान विभागले गेलेले असून, उत्तम म्हणणार्‍यांची संख्या त्याच्यापेक्षा कमी आहे. याचा अर्थच अद्याप सरकारला करण्यासारखे खूप आहे, असा स्पष्ट संदेश देतानाच जनतेने विरोधकांनाही तुम्हाला बराच टप्पा गाठायचा आहे, हेही सुचविले आहे.

जनमत पाहणी हा आरसा आहे आणि ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो!’

असे झाले सर्वेक्षण 

दि. 4 एप्रिल ते 25 एप्रिल अशा तीन आठवड्यांच्या कालावधीत ‘पुढारी’च्या वार्ताहरांनी हे सर्वेक्षण पार पाडले. यासाठी प्रत्येक वार्ताहर साधारणपणे 50 लोकांना भेटला. या लोकांना त्यांनी प्रत्येकी 10 प्रश्‍न विचारले. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे ‘पुढारी’ने बनविलेल्या एका विशेष अ‍ॅपमध्ये साठवली गेली. हे अ‍ॅप इंटरनेटच्या मदतीशिवाय चालत असल्याने अगदी ग्रामीण व दुर्गम भागांतसुद्धा पोहोचता आले. प्रामुख्याने ‘पुढारी’च्या कार्यक्षेत्रातील 25 जिल्ह्यांमध्ये ही पाहणी झाली. प्रत्येक सहभागी व्यक्तीचा मोबाईल नंबर नोंदविण्यात आला, ज्यामुळे सर्वेक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करण्यास वाव राहिला नाही. महिला व पुरुषांचे प्रमाण सारखे राहावे, अशा सूचना होत्या; मात्र प्रत्यक्षात ते थोडेसे पुरुषांकडे झुकले. हे सर्वेक्षण करताना सर्व वयोगटांतील व्यक्तींना भेटणे बंधनकारक होते. प्रत्येक वार्ताहराच्या एकूण 50 सर्व्हेपैकी प्रत्येकी 14 व्यक्ती या अनुक्रमे 18 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 या वयोगटांतील असतील, याची खबरदारी घेतली गेली. तर उरलेल्या आठ व्यक्ती या 50 वर्षे वयाच्या वरील होत्या. एकाच घरातील वा एकाच भागातील जास्त व्यक्ती असू नयेत, यासाठी वेगवेगळी गावे व विभाग कव्हर करायचे ठरविले होते. समाजातील सर्व घटक समाविष्ट व्हावेत, यासाठी लोकांचे व्यवसाय व शिक्षण ही माहितीदेखील घेतली गेली. ही सर्व माहिती रोजच्या रोज ‘पुढारी’च्या सर्व्हरवर जात होती. 

सर्वेक्षण संपल्यानंतर ‘पुढारी अ‍ॅनॅलिटिक्स टीम’ने ‘बिग डाटा अ‍ॅनॅलिटिक्स’ या तंत्राचा वापर करून संगणकीय पद्धतीने वेगवेगळी निरीक्षणे नोंदविली. ‘पुढारी’च्या संपादकीय टीमने आपल्या अनुभवाचा वापर करून योग्य ते निष्कर्ष काढले, जे आज आम्ही तुमच्यासमोर ठेवले आहेत.

संबंधित बातम्या

वाचा : ‘महा’सर्वेक्षणाचे इन्फोग्राफिक्स: आता निवडणूक झाली, तर...

वाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: लोक सरकारवर नाराज; पण...

वाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: आता फडणवीस फॅक्टर! 

वाचा : युती-आघाडीचे राजकारण अटळ! पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण 

वाचा : जनतेच्या मनाचा ठाव घेणारा व्यापक सर्व्हे : डॉ. योगेश जाधव 

Tags : Survey2018, Kaul Marathi Manacha, Daily Pudhari, ABP Majha, survey, maharashtra, politics, Maha Sarvekshan