Sat, Jul 04, 2020 16:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाचा गुणाकार अन् महापालिकेची वजाबाकी 

कोरोनाचा गुणाकार अन् महापालिकेची वजाबाकी 

Last Updated: May 30 2020 1:33AM
मुंबई : विवेक गिरधारी 
गेल्या दहा दिवसांपासून मुंबईत कोरोनाचे रोज हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत आणि रुग्णसंख्येचा आलेख उंचावत चालला असला तरी कोरोनाचा हा गुणाकार मुंबई महापालिकेला मात्र मंजूर नाही. गेल्या 9 मार्चला पहिला रुग्ण मुंबईत आढळला तो या रुग्णांमध्ये आजही मोजला जात असल्याने कोरोना रुग्णांचा मुंबईतील आकडा प्रचंड फुगला आणि त्यामुळे मुंबईबद्दल चुकीचे समज देशभर आणि जगभर निर्माण झाले. ते बदलले पाहिजेत, अशी भूमिका मांडताना पालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी कोरोना रुग्णसंख्येचा हा उंचावलेला आलेख झर्रकन खाली आणला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत संपादकांशी संवाद साधताना पालिका आयुक्‍त चहल म्हणाले, मुंबईची रुग्णसंख्या आज 35 हजारांवर असल्याचे माध्यमांमधून सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईत काही तरी भयंकर सुरू आहे, मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असे चित्र बाहेर निर्माण झाले. प्रत्यक्षात मुंबईत आमच्या रुग्णालयांमध्ये 35 हजारांवर कोरोना रुग्ण दाखल नाहीत. बरे होऊन घरी गेलेलेे, घरी क्वारंटाईन असलेले असिम्टोमेटिक म्हणजे कुठलीच लक्षणे नसलेले रुग्ण आणि दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण या संख्येतून वजा केले जात नाहीत. ते वजा केले तर आमच्या रुग्णालयांमध्ये आजघडीला फक्‍त 6 हजार 665 रुग्ण दाखल आहेत. दोन कोटी लोकसंख्येच्या या शहरात आमच्या दवाखान्यांमध्ये 6665 इतकेच रुग्ण कोरोनाचे असतील तर परिस्थिती नियंत्रणात आहे की कोरोनाची संघर्ष स्थिती आहे हे तुम्हीच ठरवा, असे आव्हानच चहल यांनी दिले. 

मुंबई महापालिकेकडून रोज रुग्णसंख्येचे जे बातमीपत्र तथा बुलेटिन दिले जाते त्यात आजवर अशी वजाबाकी बुधवारपर्यंत कधी करण्यात आलेली नाही. नोंद झालेले नवे रुग्ण आणि आतापर्यंतचे एकूण रुग्ण अशी संख्या मुंबई महापालिकेकडूनच दिली जाते. तीच स्थिती राज्याचीदेखील आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील कधी संध्याकाळी तर कधी रात्री उशीरा दिवसभरातील कोरोनाच्या  नव्या रुग्णांची आकडेवारी देताना अशी वजाबाकी करत नाहीत. आरोग्यमंत्री आणि महापालिका यांच्या माहिती देण्याच्या पद्धतीतही एकसूत्रीपणा नाही. एकजिन्सीपणा नाही. मुंबईतील नव्या रुग्ण संख्येचे आकडे नेहमीच आरोग्यमंत्र्यांचे वेगळे आणि पालिकेचे वेगळे राहत आले आहेत. त्यामुळे भरमसाठ रुग्णसंख्येच्या आकड्यांमुळे मुंबईबद्दल देशभर आणि जगभर चुकीचा समज गेला असेल तर तो या प्रशासकीय गोंधळामुळेच. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री उद्धव यांनी राज्याचे एकच बुलेटिन रोज देण्याचे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांना दिले. 

एकही रुग्ण लपवू नका 
मुख्यमंत्री उद्धव म्हणाले, प्रत्यक्षात रुग्णसंख्या ही कमी आहे आणि ती दिलासादायक आहे. आजवरच्या एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत आपण पीक वर असू किंवा पीकच्या जवळ असू तरी गेल्या दोन महिन्यांत केलेल्या मेहनतीमुळे ही स्थिती नियंत्रणात असल्याचा आनंद आहे. मात्र, येणारा पावसाळा आणि सुरू असलेली कोरोनाची साथ विचारात घेऊन आता चाचण्या वाढवाव्या लागतील. सोसायट्यांमध्ये आणि शिवसेनेच्या शाखांमध्येही छोटे क्‍लिनिक सुरू करण्याची आमची तयारी आहे. जितके रुग्ण समोर येतील तितके आपण परिस्थितीवर नियंत्रण राखून असू. त्यामुळे एकही रुग्ण लपवू नका, असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्‍त चहल यांना दिले. कोरोनाचे रुग्ण लपवण्याचे पाप आम्ही करणार नाही. सत्याला सामोरे जाऊ, असे मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले.