Sat, Jul 04, 2020 11:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांवर काँग्रेसचे टीकास्त्र

शरद पवारांवर काँग्रेसचे टीकास्त्र

Last Updated: Jul 01 2020 1:39AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

चीनने लडाखमधील भूभाग बळकावल्याच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सातारा येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी शरद पवार यांच्यावर पलटवार केला. पवार यांनी काँग्रेसच्या काळात संरक्षणमंत्री असताना काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरे झाले असते, अशा शब्दांत राऊत यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.

वीज बिलासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी ही टीका केली. ते म्हणाले, पवारांनी मोदींना प्रसारमाध्यमांना सामोरे जाऊन वस्तुस्थिती देशासमोर मांडण्याचा सल्ला दिला पाहिजे. त्यांनी ‘मन की बात’ सांगण्याऐवजी ‘जन की बात’ सांगायला हवी. तसेच आपण भूतकाळात काय केले, याचाही विचार करावा. 

चीनने भारताचा काही भाग बळकावला, असे म्हणणार्‍या पवार  यांनी, 1962 च्या युद्धावेळी वेगळी परिस्थिती होती, हे समजून घ्यायला हवे होते. यशवंतराव चव्हाण हे संरक्षणमंत्री असताना इंदिरा गांधी यांनी 1971 चे युद्ध जिंकले होते, हे पवारांना आठवले असते तर बरे झाले असते, असा टोला राऊत यांनी लगावला.

चीनने लडाखमधील किती भूभाग बळकावला आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला होता. याबाबत मोदी यांनी मैदानात येण्याऐवजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच बोलू लागले आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राजकारण करणे योग्य नाही, अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.

लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे, याबाबत आपल्याला माहिती नाही. मात्र, 1962 च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावलेला 45 हजार चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे काँग्रेसची कोंडी करणार्‍या पवार यांच्यावर काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी टीका केली आहे. 

ते म्हणाले, राहुल गांधी आमच्या पक्षाचे नेते आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आमच्या पक्षाच्या अनेकांनी बलिदान दिले आहे. चीनने घुसखोरी केली नाही, असे पंतप्रधानांनी वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.