Mon, Sep 16, 2019 05:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा

Published On: Nov 16 2018 1:31AM | Last Updated: Nov 16 2018 1:16AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर त्यांच्या पक्षातूनच मोठे आव्हान उभे करण्यात आल्याने त्यांना निवडून येण्यात अडचणी  आहेत. त्यामुळे काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला न सोडता आपल्याकडे घ्यावा, अशी एकमुखी मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथे झालेल्या पार्लमेंटरी बोर्डासमोर करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी राष्ट्रवादीला मतदारसंघ सोडण्यास तीव्र विरोध दाखविला. प्रसंगी आपणही लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस राष्ट्रवादीतील संघर्षाला धार येणार आहे. 

पार्लमेंटरी बोर्डापुढे जिल्ह्याच्या वतीने भूमिका मांडताना जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, गेली 20 वर्षे काँग्रेसला जिल्ह्यात खासदार नाही. 2009 च्या निवडणुकीत या मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव मंडलिक हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य होते. त्यामुळे हा मतदारसंघ 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला मिळायला पाहिजे होता. मात्र, तो राष्ट्रवादीला सोडण्यात आला.

राष्ट्रवादीच्या खासदारांचे नाव न  घेता पाटील यांनी राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष उफाळला असून त्याचा फटका आगामी निवडणुकीत विद्यमान खासदारानांही बसू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात येऊ नये. काँग्रेसकडे अनेक ताकदीचे व खात्रीने यशस्वी होणारे उमेदवार असून पक्षादेश देऊनही कोणी लढण्यास तयार नसेल तर आपण ही निवडणूक लढविण्यास तयार असल्याची भूमिका पी. एन. पाटील यांनी पार्लमेंटरी बोर्डासमोर मांडली. त्याचवेळी अन्य मंडळींनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांनी घेतलेल्या भूमिकेने काँग्रेसच्या चार उमेदवारांचा पराभव झाल्याची माहितीही देण्यात आली. माजी मंत्री प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, प्रदेश काँग्रेसचे चिटणीस तौफिक मुल्लाणी, प्रकाश सातपुते, राजू आवळे, सत्यजित जाधव, प्रल्हाद चव्हाण, सुप्रिया साळोखे, संजय पाटील, पार्थ मुंडे, दीपक थोरात, बयाजी शेळके आदी उपस्थित  होते. 

धनंजय महाडिक मुंबईतच

धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. मात्र, काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. हे सगळे मुंबईत घडत असताना धनंजय महाडिक हेही  मुंबईतच होते. राज्य सहकारी बँकेला केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी भेट दिली. त्या कार्यक्रमासाठी धनंजय महाडिकांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

शेट्टींना पाठिंबा देण्यावर सहमती?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यावर सहमती झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत बोलण्यास कोणी तयार नव्हते. स्वाभिमानीने भाजपच्या विरोधात उघडलेल्या आघाडीचा काँग्रेसला फायदा मिळू  शकतो, अशी भावना व्यक्त करण्यात आली. 

प्रा. मंडलिकांच्या नावाचीही चर्चा 

हा मतदारसंघ  काँग्रेसने लढविला तर अनेकजण इच्छुक असल्याचे सांगताना प्रा. मंडलिक यांच्याही नावाची चर्चा करण्यात आली. मतदारसंघ जर काँग्रेसकडे आला तर मंडलिक हे सक्षम उमेदवार होऊ शकतात, त्यासाठी त्यांचा पक्षप्रवेश करून घ्यावा लागेल, अशी पूरक माहितीही देण्यात आली.