Sun, Aug 18, 2019 06:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमपीएससी परीक्षेत सामूहिक कॉपी?

एमपीएससी परीक्षेत सामूहिक कॉपी?

Published On: Feb 12 2019 1:34AM | Last Updated: Feb 12 2019 1:33AM
मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सामूहिक कॉपीला उत्तेजन देऊन परिक्षार्थींना पास होण्यास मदत करण्यात येत आहे. मागील काही परीक्षांच्या निकालावर नजर टाकल्यास लागोपाठ क्रमांक असणारे हजारो विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षा एमपीएससी परीक्षेचा घोटाळा मोठा असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात लवकरच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

एमपीएससी परीक्षा देणार्‍यांना अर्ज भरण्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोबाईल क्रमांकाचे शेवटचे दोन डिजिट ग्राह्य धरून परीक्षा क्रमांक देण्यात येतो. त्यामुळे मागील काही महिन्यांत आपल्याला सोयीच्या उमेदवाराशी मिळते-जुळते मोबाईल क्रमांक मिळवून उमेदवार एमपीएसीकडे नोंदणी करतात. अशा प्रकारे एकापाठोपाठ परीक्षा क्रमांक असणारे उमेदवार एकमेकांना मदत करून पास होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे तांबे म्हणाले.

एमपीएससी परीक्षेतील सामूहिक कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी मोबाईल क्रमांकाच्या आधारे परीक्षा क्रमांक देण्याची पद्धत बंद करावी, 17 फेबु्रवारीला होणार्‍या परीक्षेसाठी सुधारित क्रमांक देण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.

मोबाईल लिंक कॉपी

 सुरूवातीच्या काही परीक्षांत लागोपाठ क्रमांक असणारे उमेदवार यशस्वी होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र अलिकडेच झालेल्या पोलीस निरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण 2700 उमेदवारांपैकी 1116 तर कृषी विभागाच्या परीक्षेत 6160 पैकी 3000 यशस्वी उमेदवार हे  मागे-पुढे क्रमांक असणारे आहेत.

गुणवत्ता यादीसाठी एका-एका गुणाची स्पर्धा असताना लागोपाठ क्रमांक असणारे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने कसे काय उत्तीर्ण होतात? यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. यामध्ये स्पर्धापरीक्षा क्‍लास चालक व एमपीएससीतील अधिकार्‍यांचा संबंध असल्याचे दिसून येत आहे.