Sat, Jun 06, 2020 14:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादरच्या प्रसिद्ध ‘चित्रा’ चित्रपटगृहावर पडदा!

दादरच्या प्रसिद्ध ‘चित्रा’ चित्रपटगृहावर पडदा!

Published On: May 17 2019 2:17AM | Last Updated: May 17 2019 2:17AM
मुंबई : प्रतिनिधी 

सिंगल स्क्रिन थिएटर बंद पडण्याचा सिलसिला सुरूच असून त्यात गुरुवारी दादरच्या प्रसिद्ध ‘चित्रा’ची भर पडली. हे चित्रपटगृह बंद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच दादरमधीलच शारदा चित्रपटगृहावर पडदा पडला होता. 

दादर पूर्व येथील प्रसिद्ध चित्रा चित्रपटगृह मागील अनेक वर्षे वेगवेगळे चित्रपट पडद्यावर दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. एकेकाळी मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेले हे 550 आसनी चित्रपटगृह गुरुवारपासून बंद झालेे. टायगर श्रॉफ याचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटाचा शेवटचा शो झाल्यानंतर हे चित्रपटगृह बंद करण्यात आले. 

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या चित्रपटगृहाची धुरा पी. डी. मेहता यांचा मुलगा दारा मेहता यांनी सांभाळली होती. मात्र या चित्रपटगृहाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसून आर्थिक चणचण जाणवत असल्याने हे चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

चित्रा चित्रपटगृहात 1961 साली प्रदर्शित झालेला शम्मी कपूर यांचा जंगली हा चित्रपट जबरदस्त गाजला होता. हा सिनेमा चित्रपटगृहात तब्बल 25 आठवडे चालला होता. त्यावेळी चित्रपटगृहाला मराठी प्रेक्षकांची पसंती मिळत नव्हती. परंतु कालांतराने या चित्रपटगृहाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळू लागला आणि आर्थिक चणचणही जाणवू लागली. त्यामुळेच हे चित्रपटगृह बंद करत असल्याची माहिती दारा मेहता यांनी दिली. 

या चित्रपटगृहात 1983 साली प्रदर्शित झालेला अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा हिरो हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यावेळी त्या चित्रपटाचे हाऊसफुल शो सुरू होते. त्याच चित्रपटगृहाचा शेवट त्यांचा मुलगा म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफच्या सिनेमाने झाला.

मुंबईत अलीकडेच ‘शारदा’ थिएटरही बंद करण्यात आले होते. अर्थात त्याचे कारण वेगळे होते. ही जागा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मालकीची असून ट्रस्टने थिएटरची जागा भाड्याने दिली होती. भाड्याची मुदत संपल्यानंतर व त्याबाबतची न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर ‘शारदा’ थिएटर चालवणार्‍या भाडेकरूना ट्रस्टने थिएटरमधील खुर्च्या, प्रोजेक्टर, वातानुकूलन यंत्रणा, त्याचबरोबर छताचा भागही हलवण्यास भाग पाडल्याने थिएटरच्या ठिकाणी आता फक्त भिंती उभ्या असून आणखी एक एकपडदा थिएटर काळाच्या पडद्याआड निघाले आहे.