Wed, Feb 26, 2020 19:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेने भगवा खाली ठेवलेला नाही : उद्धव

शिवसेनेने भगवा खाली ठेवलेला नाही : उद्धव

Last Updated: Jan 24 2020 2:39AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेने भगवा खाली ठेवलेला नाही, आमचे अंतरंग भगवेच आहे, अशी ग्वाही देताना आपल्याला खोटे पाडण्याचा प्रयत्न झाल्यानेच वेगळा मार्ग स्वीकारला, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत उध्दव यांचा शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. मला खोटे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण खोटे पाडणारेच संपूर्ण उघडे पडले, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. 

जल्लोष या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव यांना सोनचाफ्याचा भलामोठा हार घालून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव म्हणाले, कोणी काही म्हणाले म्हणून मी डरणार नाही, तर मी लढणार आहे. मी केवळ उद्धव ठाकरे नाही, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी खोटे बोलणार नही. मी पळणार नाही. मी लढेन. तुम्ही दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन. गेली 30 ते 40 वर्षे ज्यांच्या विरोधात लढा दिला, त्यांच्या हातात हात घालून सरकार बनविले. होय. बनविले आहे. जनतेच्या विकासासाठी हा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय घेतल्यानंतर मला खोटे पाडण्याचा प्रयत्न झाला. या प्रयत्नात जर मी अडकलो असतो तर मी तुम्हाला कसे तोंड दाखवले असते मात्र माझे साथी, सोबती आणि संगती तुम्हीच आहात. तुमच्याच साथीने हे पद स्वीकारले आहे. मी स्वत: मुख्यमंत्री होईन, असा शब्द मी शिवसेनाप्रमुखांना दिला नव्हता. मात्र एका वेगळ्या परिस्थितीत हा निर्णय घ्यावा लागला. आता जबाबदारी स्वीकारली तर ती पार पाडेन.

जन्मोजन्मी ऋणी

छत्रपती शिवरायांनी सिंहासनारूढ होताना ज्या भावना व्यक्त केल्या आणि तानाजी, बाजी, मुरारबाजी या आपल्या निष्ठावंत सहकार्‍यांची आठवण काढली, तीच भावना माझ्या मनात आहे. शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून तुमच्याप्रती कायम नम— आहे. एकच काय, जन्मोजन्मी मी तुमचा ऋणी राहीन. एवढे प्रेम तुम्ही शिवसैनिकांनी मला दिले आहे. अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडले. प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण करतो. मी कुठल्याही लढ्याला घाबरत नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

या वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अजय-अतुल, शंकर महादेवन, अवधुत गुप्ते, अभिजित केळकर, मयूरेश पेम, बेला शेंडे, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर यांसह अनेक कलाकारांचे मनोरंजनपर कार्यक्रम झाले. दरम्यान, आज शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर हजारो शिवैनिकांनी जाऊन आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदींचा यात समावेश होता.