Fri, Sep 20, 2019 21:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समस्यांच्या गर्तेत मध्य रेल्वे

समस्यांच्या गर्तेत मध्य रेल्वे

Published On: Dec 03 2018 1:41AM | Last Updated: Dec 03 2018 1:19AMमुंबई : संजय गडदे

वाढलेल्या लोकलफेर्‍या, हार्बरचा गोरेगावपर्यंतचा विस्तार, नेरुळ-खारकोपर लोकलसेवा अशा विविध कारणांमुळे मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्येत प्रचंड भर पडत आहे. यंदा  एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेवरील लोकल गर्दीत दररोज 74 हजार प्रवाशांची भर पडत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील दररोजची प्रवासीसंख्या आता 42 लाख 74 हजार एवढी झाली आहे. वाढलेल्या प्रवासीसंख्येमुळे मध्य रेल्वेच्या महसुलातही भरघोस वाढ झाली. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबपर्यंत 700 कोटी रुपयांपर्यंत असलेल्या महसुलात यंदा 22 कोटी रुपयांनी वाढ झाली. मात्र उत्पन्न वाढले तरी मध्य रेल्वेमार्गावरील समस्या मात्र काही कमी होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

मध्य रेल्वेमार्ग सुमारे 182 किलोमीटर लांबीचा आहे. कसारा, खोपोली, पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नेरूळ ते खरकोपर या मार्गांवर धावणार्‍या उपनगरी रेल्वेच्या गाड्या या गाड्यांच्या वर असलेल्या विजेच्या तारांमधून मिळणार्‍या25,000 व्होल्ट ए.सी. वीज पुरवठ्यावर चालतात. या रेल्वेगाड्यांना प्रत्येकी 3 किंवा 4 ई.एम.यू. (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) जोडलेली असतात. युनिटच्या संख्येनुसार गाडीला 12 किंवा 15 डबे असतात. अशा एकूण 191 गाड्यांद्वारे 2,342 फेर्‍यांतून रोज सुमारे 75 लाखांहून जास्त प्रवासी प्रवास करतात.

लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन. मात्र, काहीवेळा मेगाब्लॉग तर अनेकवेळा भोंगळ कारभारामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. रोज मरे त्याला कोण रडे, अशी म्हण प्रवाशांमध्ये नेहमी ऐकायला मिळते. दिवसागणिक वाढणारी गर्दी यामुळे रेल्वेवर ताण येत आहे. असे असताना कधी ओव्हरहेड वायर तुटणे, तर कधी मेगाब्लॉगचा त्रास. अचानक सिग्नल यंत्रणा कोलमडने, तर कधी मालगाडीचा डबा घसरणे. यातच योग्य त्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत नाहीत. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो.

विलंब पाचवीलाच पुजलेला

लोकल उशिरा धावण्याची समस्या मुंबईकरांना दररोज भेडसावत असून मेल/एक्स्प्रेस गाड्यांना होणारा उशीर, रुळांवर गाड्यांच्या धडकेने झालेले अपघात, तांत्रिक बिघाड, पाऊस आदींची भर पडत असल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेवर पाच रेल्वे फाटकांचा प्रश्न प्रलंबित राहिल्याची भरही त्यात पडली आहे. मध्य रेल्वेवर 1 हजार 708 फेर्‍या चालविल्या जातात. मध्य रेल्वेवरील सरासरी 87 ते 90 टक्क्यांच्या आसपास असल्याने रोज 170 वा त्याहून अधिक फेर्‍या रद्द होतात. प्रवासीसंख्येचाही भार वाढत असल्याने काही मिनिटांचा विलंब सर्वच सेवांवर विपरित परिणाम करत असल्याचे ज्येष्ठ अधिकारी सांगतात. 

मुंबई : रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्‍न देशाच्या अन्य भागांप्रमाणे मुंबईतही कायम आहे आणि अशा उघड्या-नागड्या क्रॉसिंग खालून बेजबाबदारपणे मुंबईकर असे धडपडत जात असतात. याकडे प्राधान्याने बघावे, असे रेल्वे प्रशासनाला अजूनही वाटले नाही.

मध्य रेल्वेच्या मार्गासाठी धोकादायक ठरणार्‍या पत्रीपुलाचे तोडकाम पूर्ण झाले असून नव्या पुलाची जुळवाजुळव सुरू असतानाच कल्याण पलीकडे असे जुने सहा पूल जीर्ण झाल्याचे निरीक्षण प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आले आहे. शिवाय मस्जिद बंदर, परळ या भागातील ब्रिटिशकालीन पुलांचे प्रश्‍न रेल्वेला भेडसावत आहेत.

दादर स्थानकावरील क्रॉस ओव्हर ब्रिज

डेंजर झोनपैकी एक म्हणजे दादर स्थानकावरील क्रॉस ओव्हर ब्रिज. याठिकाणी दोन लाईट आणि शस्त्रधारी सुरक्षारक्षक आहे. पण तरीही गर्दी आणि कमी प्रकाशाचा फायदा घेऊन महिलांना चुकीचा स्पर्श करण्याचे प्रकार वरचेवर घडत असतात. नव्याने तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकवर अद्याप सीसीटीव्ही नाहीत. मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री 12 नंतर अत्यंत मोजके लाईट असतात. वीज बचतीसाठी असे केले जात असले तरी महिला सुरक्षेच्या दृष्टीने विशेषतः रात्री उशिरा प्रवास करणार्‍या महिलांसाठी ते अत्यंत धोकादायक ठरते. 

महिला डब्यांमध्ये गर्दुल्‍ले, तृतीयपंथियांची दादागिरी

मध्य रेल्वे मार्गावरील महिलांच्या डब्यात गर्दीच्या वेळी अनेकदा गर्दुल्‍ले, टपोरी आणि तृतीयपंथियांचा वावर अधिक असतो. यातील गर्दुल्‍ले तर नशापाणी करुन आलेले असल्याने ते अनेकदा जाणूनबुजून महिलांना धक्का मारत असतात. शिवाय टपोरी मुलेही गर्दीचा फायदा घेत महिलांना धक्का मारण्याचा प्रयत्न करतात. या सर्व गोष्टींची महिलांनी अनेकदा रेल्वेकडे तक्रार केली असली, तरी अशा लोकांवर नावाला कारवाई करण्यात येत असते.

अपंगांसाठी स्वच्छतागृहांची वानवा

मध्य, हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात असून त्या मानाने प्रवासी सुविधांची कमतरता आहे. त्यात अपंग प्रवाशांसाठी सुविधांची वानवाच आहे. मध्य रेल्वेवरील 17 स्थानकांवर अपंगांसाठी स्वच्छतागृहच नसल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेवर एकूण 76 रेल्वे स्थानके असून त्यापैकी 59 स्थानकांवर अपंग प्रवाशांसाठी स्वच्छतागृहे आहेत, तर 17 स्थानकांवर अपंगांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. त्यात चिंचपोकळी, करी रोड, नाहूर, पळसदरी, केळवळी आदी स्थानकांचा समावेश आहे.

रेल आहारचालकांकडून लूट

रेल्वे बोर्डाने परे आणि मरे स्थानकावरील सर्व आहार केंद्र चालकांना समसमान दरात पदार्थ विक्री करण्यास परवानगी दिली असताना, मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवरील आहार केंद्र चालकांकडून मात्र समोसा, वडा आणि रगडा यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. यातून प्रवाशांची लूट होत आहे.