Thu, May 23, 2019 22:17
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तार दसर्‍यानंतर करा : सेनेचा आग्रह

मंत्रिमंडळ विस्तार दसर्‍यानंतर करा : सेनेचा आग्रह

Published On: Oct 12 2018 1:40AM | Last Updated: Oct 12 2018 1:37AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मंत्रिमंडळ विस्तार करण्याची भाजपने तयारी केली असून भाजपची संभाव्य मंत्र्यांची यादीही दिल्लीला पाठविण्यात आली आहे. शिवसेनेची मात्र विस्तार होणार असल्यामुळे कोंडी झाली असून दसर्‍यानंतर विस्तार करण्याचा आग्रह शिवसेनेने धरल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली. 

राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होणार हे आता निश्‍चित झाले आहे. भाजपच्या पाच ते सहा नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. त्याबाबत संभाव्य नावांची यादीही दिल्लीला पाठविण्यात आली आहे. आरपीआय आठवले गटाकडून अविनाश महातेकर यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र, शिवसेनेची नावे अजूनही निश्‍चित झालेली नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या एक किंवा दोघांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या जागेवर कोणाची वर्णी लावायची याचा मोठा पेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापुढे आहे. 

शिवसेनेच्या काही विद्यमान मंत्र्यांविरोधात शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुका जिंकणार्‍या आमदारांना मंत्रीपद देण्याऐवजी विधानपरिषदेवर असलेल्या नेत्यांना कॅबीनेट मंत्रीपदे देण्यात आल्याने शिवसेनेत खदखद आहे. या मंत्र्यांच्या कामाविषयी आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे नाराजीही बोलून दाखविली आहे. मात्र, शिवसेनेच्या या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपदावरुन हटविणे कठीण आहे. 

मंत्रिमंडळाच्या या शेवटच्या विस्तारात समावेश व्हावा म्हणून शिवसेनेचे डझनभर आमदार इच्छूक आहेत. विस्तारात एखादे खाते मिळण्याची शक्यता असताना आमदारांचे समाधान करणे उध्दव ठाकरेंसाठी अवघड आहे. हा पेच अजूनही सुटला नसल्याने दसर्‍यानंतर विस्तार व्हावा म्हणून शिवसेना आग्रही असल्याचे बोलले जात आहे.