Mon, Jul 22, 2019 12:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इमारत बांधकाम परवानगी अवघ्या 40 दिवसांत!

इमारत बांधकाम परवानगी अवघ्या 40 दिवसांत!

Published On: Aug 11 2018 1:40AM | Last Updated: Aug 11 2018 1:29AMमुंबई  : प्रतिनिधी 

इमारत बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया आता गतिमान झाली आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यापासून अर्जदारास 60 दिवसांत परवानगी देण्याचे लक्ष्य निर्धारित केले असले, तरी प्रत्यक्षात सरासरी 40 दिवसांतच परवानग्या मिळत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात तर अर्ज केल्यापासून 1 ते 7 दिवसांत प्राथमिक परवानग्या देण्यात आल्याचे पालिकेच्या विकास नियोजन विभागाकडून सांगण्यात आले. 

मुंबईत इमारतीचे बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठी विविध टप्प्यांनुसार परवानग्या दिल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने सवलत परवानगी, आयओडी, सीसी, ओसी यासारख्या टप्पानिहाय परवानग्यांचा समावेश आहे. या प्रत्येक परवानगीसाठी पूर्वी एक वर्षापेक्षाही अधिक कालावधी लागत होता. मात्र इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत बांधकामविषयक परवानग्यांच्या प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या परवानग्यांसाठी पूर्वी लागणारा एक वर्षाचा कालावधी आता जास्तीत जास्त 40 दिवसांपर्यंत आला आहे.  बांधकाम परवानग्यांसाठी लागणार्‍या कालावधीमध्ये मोठ्याप्रमाणात बचत होण्यासह पारदर्शकता जपणेही शक्य झाले असल्याचे विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी सांगितले. महापालिकेच्या या वेगवान परवानगीची नोंद केंद्र शासन व निती आयोगाच्या स्तरावरही घेण्यात आली आहे. त्यामुळे अन्य महापालिकांनाही मुंबई महापालिकेचा कित्ता गिरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार लखनऊ, चेन्नई, अहमदाबाद,चंदीगढ, पोर्ट ब्लेअर, सुरत, हैदराबाद इत्यादी शहरांनी मुंबई महापालिकेशी संपर्क साधून मार्गदर्शन घेतले आहे. तर काही ठिकाणी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी स्वतः भेट देऊन तेथील अधिकार्‍यांना  मार्गदर्शन केले असल्याचेही संजय दराडे यांनी सांगितले. 

1 हजार 508 अर्जांना मंजुरी

ऑनलाईन बांधकाम परवानगीबाबत संगणकीय आकडेवारीनुसार 1 जानेवारीपासून 8 ऑगस्ट  यादरम्यान इमारत बांधकामाच्या प्राथमिक टप्प्यावरील सवलत परवानगीसाठी महापालिकेकडे 3 हजार 293 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यापैकी योग्यप्रकारे भरलेल्या, सोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या संगणकीय प्रती जोडलेल्या व परिपूर्ण असलेल्या 1 हजार 508 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 6 प्रकरणी अर्ज केला त्याचदिवशी मंजुरी देण्यात आली आहे. तर 70 प्रकरणांमध्ये ही परवानगी केवळ 7 दिवसांत देण्यात आली आहे. आयओडीसाठी 1 जानेवारी ते 8 ऑगस्ट या कालावधीत  महापालिकेकडे 363 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 244 अर्जांना मंजुरी देण्यात आली. सीसीकरिता प्राप्त झालेल्या 227 अर्जांपैकी 180 अर्जांना तर, ओ.सी.साठी 478 अर्ज प्राप्त झाले, तर याच कालावधी दरम्यान 317 अर्जांना मंजुरी देण्यात आल्याचे विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी सांगितले.