Sat, Aug 24, 2019 09:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेता महेश आनंद यांचा संशयास्पद मृत्यू

अभिनेता महेश आनंद यांचा संशयास्पद मृत्यू

Published On: Feb 09 2019 7:32PM | Last Updated: Feb 10 2019 1:53AM
मुंबई : प्रतिनिधी

विविध हिंदी चित्रपटांत खलनायकाची भूमिका करणारे अभिनेते आणि निर्माते महेश आनंद यांचा शनिवारी दुपारी राहत्या घरी मृतदेह सापडला होता. मात्र त्यांच्या मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याची माहिती पुढे येत आहे. 

वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. विदेशात असलेल्या पत्नीलाही कळवण्यात आले आहे. त्यांची विवाहित बहीण लता दासगुप्ता या सोनीमध्ये सीईओ म्हणून कार्यरत असून, त्यांनाही कळविण्यात आले आहे.

अंधेरीतील वर्सोवा- यारी रोडवरील किनारा अपार्टमेंटच्या के विंगच्या फ्लॅट क्रमांक 102 मध्ये महेश आनंद हे कुटुंबीयांसह राहात. त्यांची पत्नी सध्या विदेशात आहे. त्यांना मद्यप्राशन करण्याचे व्यसन होते. त्यातच सध्या काहीच काम नसल्याने आर्थिक चणचण होती, त्यातून प्रचंड मानसिक तणावात ते होते. दारूसाठी मित्रांकडूनही  पैसे घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. 

शनिवारी दुपारी मोलकरीण कामासाठी आली असता वारंवार बेल वाजवूनही आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. फ्लॅटला कुलूप नव्हते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्सोवा पोलिसांसह फायर बिग्रेडच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महेश आनंद यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये पडल्याचे दिसले. कूपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा शवविच्छेदन अहवाल रविवारपर्यंत आल्यानंतर मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकेल.

गुरुवारी महेश आनंद यांनी भरपूर मद्यप्राशन केले; मात्र ते जेवले नव्हते, त्यांचे जेवण तसेच पडल्याचे पोलिसांना दिसून आले. 

महेश आनंद यांचे व्यक्‍तिगत आयुष्य तसे उलथापालथीचेच होते. पहिला विवाह बरखा रॉयशी झाला. बरखा सिनेअभिनेत्री रिना रॉयची बहीण आहे. नंतर त्यांनी मिस इंडिया इंटरनॅशनल असलेल्या इरिका मारिया डिसोझाशी दुसरा विवाह केला. या दोघांचा त्रिशूल आनंद नावाचा एक मुलगा आहे. त्यानंतर मधू मल्होत्राशी त्याचा तिसरा विवाह झाला तो अगदी अलीकडे.  

महेश आनंद यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले. बहुतांश चित्रपटात त्यांनी खलनायक रंगवला. गंगा जमुना सरस्वती (1988), शहेनशहा (1988) थानेदार (1990), कुली नंबर वन (1995), आया तुफान (1999), लाल बादशाह (1999), बागी (2000), कुरुक्षेत्र (2000) आणि प्यार किया नही जाता (2003) या गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या होत्या.