Sun, May 31, 2020 10:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘बेस्ट’ प्रवासी वाढले; उत्पन्न घटले

‘बेस्ट’ प्रवासी वाढले; उत्पन्न घटले

Published On: Jul 12 2019 2:09AM | Last Updated: Jul 12 2019 2:02AM
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेकडून मिळणार्‍या आर्थिक सहाय्याच्या बदल्यात बेस्टने बस भाड्यात कपात केली आहे. पण ही कपात त्यांना चांगलीच महागात पडली आहे. प्रवासी संख्येत 5 लाख 65 हजाराने वाढ झाली असली तरी, उत्पन्नात दररोज तब्बल 63 लाख  90 हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे येणार्‍या महिनाभरात सुमारे 20 ते 22 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

भाडे कपात व भाड्याने बस घेतल्या तरच आर्थिक सहाय्य मिळेल अशी अट मुंबई महापालिकेने बेस्टवर टाकली होती. ही अट बेस्टने मान्य केल्यामुळे पालिका 600 कोटी रुपयांचे अनुदान देण्यास तयार झाली आहे. यापैकी 100 कोटी रुपयांचा हप्ता तातडीने मिळावा यासाठी बेस्टने तातडीने भाडे कपातीचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर, भाडे तत्वावर बस दाखल करण्याच्या प्रस्तावाला घाईगडबडीत मंजुरी दिली. 

भाडे कपातीचे राजकीय पक्षांसह मुंबईकरांनी जोरदार स्वागत केले आहे. पण या कपातीमुळे बेस्टच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. 8 जुलै रोजी बेस्टच्या बसने सुमारे 17 लाख 15 हजार प्रवाशांनी प्रवास केला. यातून बेस्टला तब्बल 2 कोटी 12 लाख 33 हजार 260 रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र किमान भाडे 8 रुपयावरून 5 रुपये करण्यात आल्याने मुंबईकरांनी बेस्टकडे धाव घेतली. त्यामुळे पहिल्याच दिवशी 5 लाख प्रवासी वाढले. 

बुधवार (दि. 10) प्रवासी संख्या 5 लाख 65 हजाराने वाढली. त्यामुळे या दिवशी दिवसभरात 22 लाख 80 हजार 317 प्रवाशांनी प्रवास केला. मात्र उत्पन्न 63 कोटी 90 लाख रुपयाने कमी होऊन ते 1 कोटी 48 लाख 43 हजार 174 रुपयावर आले. ही घट बेस्टच्या परिवहन विभागाचे गणित बिघडू शकते.