Sun, May 31, 2020 19:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फरार मल्ल्याला हायकोर्टाचा दणका

फरार मल्ल्याला हायकोर्टाचा दणका

Published On: Jul 12 2019 1:53AM | Last Updated: Jul 12 2019 1:28AM
मुंबई : प्रतिनिधी 

भारतातल्या बॅकांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणार्‍या मद्यसम्राट विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाने आणखी दणका दिला. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केलेली मालमत्ता जप्तीची कारवाई थांबवण्यास स्पष्ट नकार देत न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती एस. जेकाथावाला यांच्या खंडपीठाने मल्ल्याची याचिका फेटाळून लावली. मल्ल्यावर फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. या नव्या कायद्यातील तरतुदीनुसार ईडीला फरार आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मिळतो. याबाबतची कारवाई सध्या विशेष न्यायालयात सुरू आहे. 

या कारवाईला तूर्तास स्थगिती द्या, अशी विनंती करणारी याचिका मल्ल्याच्या वतीने करण्यात आली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती एस.जे. काथावाला यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी झाली. यावेळी मल्ल्याच्या वतीने आपण कोणताही आर्थिक गैरव्यवहार केला नसल्याचा दावा करण्यात आला. तसेच संबंधित कायद्यातील तरतुदीही अयोग्य असल्याचे सांगत कारवाईला स्थगिती द्यावी अशी विनंती केली. याला ईडीने जोरदार विरोध केला. फरार आरोपीला देशात परत आणण्यासाठीच अशा प्रकारची कठोर कारवाई केली जाते. मल्या सध्या इंग्लंडमध्ये असून तो भारतामध्ये परत येण्यास तयार नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात ही कारवाई सुरू असल्याचे अ‍ॅड.हितेंद्र वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने मल्ल्याची याचिका फेटाळून लावली. हा मल्ल्यासाठी जोरदार दणका आहे.