Fri, Feb 22, 2019 01:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदीने वृत्तपत्र रद्दीला अच्छे दिन

प्लास्टिकबंदीने वृत्तपत्र रद्दीला अच्छे दिन

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:11AMमुंबई : संजय गडदे

प्लास्टिक बंदीचा चांगलाच धसका मुंबई शहरातील लहान-मोठ्या व्यापार्‍यांनी घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शहरात प्लास्टिकऐवजी वर्तमानपत्राच्या रद्दीचा वापर वाढला आहे़ पूर्वी प्लास्टिकमध्ये दिले जाणार्‍या अनेक वस्तू आता वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून दिल्या जात आहेत. 

प्लास्टिकबंदीमुळे सर्वच क्षेत्रात वर्तमानपत्राची रद्दी आता मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागल्याने रद्दीला अच्छे दिन आले आहेत. मुंबई आणि उपनगरात रद्दीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने मागणीतही वाढ झाली असून, वर्तमानपत्राच्या रद्दीच्या किमतीमध्ये सुमारे 25 टक्क्यांची वाढ झाली.

राज्यभर लागू झालेल्या प्लास्टिक बंदीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणींत काहीशी भर पडली असली, तरी याचा एक चांगला फायदाही दिसून येत आहे. प्लास्टिक पिशव्यांवर आलेल्या बंदीमुळे कागदी पिशव्यांची मागणी अचानक वाढली असून, त्यामुळे वृत्तपत्रांच्या रद्दीलाही चढा भाव आला आहे. काही दिवसांपूर्वी 12-14 रुपये किलोने खरेदी केली जाणारी वृत्तपत्रांची रद्दी आता 20 ते 22 रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे. प्लास्टिकबंदी लागू झाल्यापासून प्लास्टिक पिशव्यांना पर्याय शोधण्यासाठी सार्‍यांचीच धावाधाव सुरू झाली आहे. कागदी पिशव्या हा प्लास्टिकला सर्वात सोपा व स्वस्त पर्याय आहे. त्यामुळे दुकानादुकानांतून कागदी पिशव्यांचा वापर वाढला आहे.