Fri, Jan 24, 2020 04:53
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी भाजपाच्या काळात : फडणवीस

'देशातील मोठी कर्जमाफी भाजपाच्या काळात'

Published On: Aug 24 2019 1:28AM | Last Updated: Aug 24 2019 8:13AM
जळगाव : प्रतिनिधी

पाच वर्षांत जनतेने आमचे मूल्यमापन केले आहे. म्हणूनच जनता आमच्या पाठीशी आहे. देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी भाजपाने केली आणि अजूनही कर्जमाफी करीत आहे, अशी स्पष्टोक्‍ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने 1200 कोटींचे कर्ज माफ केले होते. आम्ही 10 हजार कोटींची कर्जमाफी केल्याचा उल्लेख करीत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.

मुख्यमंत्र्यांची दुसर्‍या टप्प्यातील महाजनादेश यात्रा शुक्रवारी जळगाव येथे आली. त्यावेळी या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार सूरजितसिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, महापौर सीमा भोळे, ललित कोल्हे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शहर असो किंवा जिल्हा वर्षानुवर्षे आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे या कर्जातून आम्ही कधीच मुक्‍त होऊ शकणार नाही. त्यामुळे आम्ही निधीही कधीच कमी पडू देणार नाही. जळगाव जिल्हाच नव्हे तर खान्देश नेहमी आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. आम्ही सुरू केलेल्या प्रकल्पांना 15 वर्षांत निधी मिळत नव्हता. मात्र, आता ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण निधी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पाणीप्रश्‍न सुटणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने...

गिरीश महाजन म्हणाले, की वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे हे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. विरोधात असताना यात्रा काढल्या आणि सत्तेत असताना प्रथमच यात्रा काढणारे सरकार आहे. काँग्रेसने यात्रा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंतर्गत वादामुळे स्थगित झाली. तसेही काँग्रेस हे व्हेंटिलेटरवरच्या अवस्थेच्या बाहेर गेले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यांनी यात्रेसाठी संभाजी महाराज यांची भूमिका करणार्‍या अभिनेत्यालाच आणले.