होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप-शिवसेना युतीची घोषणा १९ सप्टेंबरला शक्य

भाजप-शिवसेना युतीची घोषणा १९ सप्टेंबरला शक्य

Published On: Sep 16 2019 1:55AM | Last Updated: Sep 16 2019 1:50AM
मुंबई : वृत्तसंस्था
भाजप-शिवसेना युतीची घोषणा येत्या 19 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सांगता कार्यक्रमात होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले आहेत.

भाजप-शिवसेना यांच्यात युती होणार हे आता निश्‍चित झाले आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी तसे विधान वारंवार केले आहे. दोन्ही पक्षांच्या जागा आणि काही मतदारसंघांची अदलाबदल या विषयावर चर्चाही झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युतीवर शिक्‍कामोर्तब होऊ शकते. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 144 जागा घ्यायच्या आणि मित्रपक्षांना देण्यात येणार्‍या 18 जागांपैकी प्रत्येकी  नऊ जागा आपल्या कोट्यातून द्यायचा, असा प्रस्ताव शिवसेनेने मांडला आहे.

भाजपने त्याला पाठिंबा दिलेला नाही.  अथवा त्याचा इन्कारही केलेला नाही. जागावाटपाबाबत काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र चर्चेतून त्यावर तोडगा निघू शकतो. त्यामुळेच नाशिकमध्ये युतीची घोषणा होईल, असे प्रसाद लाड यांचे म्हणणे आहे. दरम्यान, एकीकडे युती निश्‍चित असतानाच दुसरीकडे शिवसेनेने सर्व 288 मतदारसंघांचीही चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी ‘मातोश्री’वर बैठकांचे सत्र सुरू आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मतदारसंघांची चाचपणी केली याचा अर्थ सर्वच जागा लढविणार असा होत नाही. काही मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते. त्यामुळेच सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे.

लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा : राऊत

देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर विरोधी पक्षांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाचं महत्त्व कमी झाले तर सरकारवर अंकुश राहात नाही, असे वक्‍तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. सध्या पक्ष बदलणे हे कपडे बदलण्याइतके सोपे झाले आहे, असे ते म्हणाले.