Fri, Sep 20, 2019 21:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पिचलेले, गांजलेले, रखडलेले प्रश्‍न निघून गेले अन् सुने सुने झाले गजबजलेले आझाद मैदान

पिचलेले, गांजलेले, रखडलेले प्रश्‍न निघून गेले अन् सुने सुने झाले गजबजलेले आझाद मैदान

Published On: Dec 02 2018 1:45AM | Last Updated: Dec 02 2018 1:22AMमुंबई : रोहिणी साळुंखे

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होताच राज्याच्या कानाकोपर्‍यातून असंख्य प्रश्‍न घेऊन शेकडो पिचलेले, गांजलेले, न्यायाच्या प्रतीक्षेत असणारे आझाद मैदान गाठतात. आझाद मैदानात ठिय्या मांडून आंदोलन केले की आपले प्रश्‍न सरकारच्या कानी पडतात आणि न्याय मिळतो. या आशेपोटी अनेकजण आझाद मैदानात धाव घेतात. आंदोलनातून प्रश्‍न कितपत सुटले हा मात्र नंतरच्या अभ्यासाचा विषय होतो. शुक्रवारी आंदोलनाच्या मैदानातली लोकशाहीची जत्रा संपली आणि प्रशासनाने हुश्श केले.

गेल्या बारा दिवसाच्या आंदोलनात सर्वात जास्त  चर्चेत राहिले ते मराठा आरक्षण, संवाद यात्रा, संगणक परिचालकांचे आंदोलन, मातंग क्रांती मोर्चा, ओबीसी समाजाने विधेयकाची प्रतीकात्मक केलेली होळी व आक्रोश मोर्चा, शेतकरी लाँगमार्च व सुकाणू समितीचा शेतकरी मोर्चा व कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी केलेेले आंदोलन. या आंदोलनांसाठी आलेल्या शेतकर्‍यांनी सोबत आणलेल्या भाकरी चटणीची शिदोरी दोन-दोन दिवस वाळवून खाल्ली. लहान मूले, महिला, वृद्ध राज्याच्या विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने आले होते. यातील  अनेक आदिवासी शेतकरी पहिल्यांदाच मुंबई बघणारे होते. मोर्चाइतकेच त्यांना जास्त कुतुहूल मुंबईचेही होते. 

मराठा, धनगर, मुस्लिम कार्यकर्ते आरक्षण मिळण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात धरणे देऊन बसले होते. महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ, माथाडी कामगारांचा मोर्चा, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना, शासकीय-निमशासकीय लिपीक मोर्चा,  विद्युत मंडळाच्या निवृत्त कर्मचार्‍यांचा मोर्चा, तांत्रिक एप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या वतीने अर्धनग्न व शिमगा आंदोलन केले. कोतवालांचे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन, निर्माण मजदूर संघटना, महाराष्ट्र राज्य वाल्मीकी, रुखी, मेहतर, समाज हक्क समिती मातंग समाजावर सातत्याने होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरुद्ध मातंग क्रांती महामोर्चाही मैदानात उतरला होता. तर मोर्चांमध्ये आय टी आय शिक्षक मोर्चा, प्रयोगशाळा कर्मचारी मोर्चा, डीटीऐड आणि बीएड मोर्चा, महाराष्ट्र शालेय पोषण आहार कर्मचारी, शाळा अनुदानासाठी काढलेले मोर्चे आदी सर्वात जास्त आंदोलने ही शिक्षण विभागाची होती. यात शिक्षकांनी मुंडण आंदोलन, भजन आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधले होते.

आझाद मैदानात हजारो आंदोलक आंदोलनात आले होते. त्यांचे सुविधेअभावी हाल झाले होते. काही आयोजकांनी आंदोलकांची जेवणाची, राहण्याची सोय केली नसल्याने वैतागले होते. काही आंदोलक स्वच्छतागृहासाठी कमी पाणी असल्याने दुर्गंधीला त्रासले होते. तर काही आंदोलकांना वेळेचे कारण देत मैदानाबाहेर काढण्यात आल्याने त्यांना रात्र रेल्वेस्थानकात बसून काढावी लागली.

आझाद मैदानातल्या आंदोलनांना भेट देण्यासाठी येणारी राजकीय नेते मंडळी स्वत:च्या फायद्यासाठी येत असल्याची दिसत होती. आगामी निवडणुका समोर ठेवून मतांची बेरीज करुन मतदारसंघातील आंदोलने, जास्त गर्दीच्या आंदोलनांनाच फक्त सर्व राजकीय नेते मंडळी भेट देऊन आश्‍वासनांची खैरात करीत होती.

यंदाची आंदोलने 

19 नोव्हेंबर 29 आंदोलने
20 नोव्हेंबर 24 आंदोलने
21 नोव्हेंबर 29 आंदोलने
22 नोव्हेंबर 35 आंदोलने
23 नोव्हेंबर 19 आंदोलने
24 नोव्हेंबर 16 आंदोलने
25 नोव्हेंबर 14 आंदोलने
26 नोव्हेंबर 41 आंदोलने
27 नोव्हेंबर 38 आंदोलने
28 नोव्हेंबर 40 आंदोलने
29 नोव्हेंबर 40 आंदोलने
30 नोव्हेंबर 32 आंदोलने