Sun, Jul 05, 2020 13:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जे राष्ट्रात तेच महाराष्ट्रात

जे राष्ट्रात तेच महाराष्ट्रात

Last Updated: May 25 2020 1:26AM
मुंबई : दिलीप सपाटे 

देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असतानाही कोरोना चाचण्या घेण्याचे राज्यातील प्रमाण चिंताजनक आहे. राज्यात दिवसाला सरासरी फक्‍त 10 ते 11 हजार कोरोना चाचण्या होत असताना प्रचंड संख्येने रुग्ण समोर येत आहेत. या चाचण्या वाढवल्या तर कोरोना रुग्ण संख्येचा प्रस्फोट होऊ शकतो, असे जाणकारांना वाटते.   

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाच्या चाचण्यांची संख्या जास्त असली तरी कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग पाहता या चाचण्या कमीच आहेत. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे  महानगर क्षेत्र, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, मीरा-भाईंदर, मालेगाव, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर,औरंगाबाद, नागपूर, अकोला आदी मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. मात्र ज्या रुग्णांत तीव्र लक्षणे आढळत आहेत त्यांचीच चाचणी घेतली जात आहे.

कोरोना रुग्ण सापडला तरी संबंधित परिसरात कोरोना चाचण्या आणि सर्वेक्षण होत नसल्याने रुग्णसंख्या वाढत चालली आहे. विशेषतः तपासणी होत नसल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.  राज्यात रेड, बिगर रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. राज्यातील जवळपास निम्मी म्हणजे 6 कोटींपेक्षा अधिक जनता ही रेड झोनमध्ये आहे. तर 1949 कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र आजवर 66 लाख लोकांचेच सर्वेक्षण झाले आहे. याचा अर्थ फक्त 5. 52 टक्के लोकांचेच सर्वेक्षण झाले आहे. शुक्रवारपर्यंत 3 लाख 32 हजार 777 जणांचीच कोरोना चाचणी झाली आहे. रेड आणि कंटेन्मेंट झोनमधील लोकांची संख्या पाहता चाचणी झालेल्या लोकांची संख्या ही नगण्य आहे. त्यामुळे चाचण्या वाढल्या नाहीत तर कोरोनाला नियंत्रित करणे कठीण होणार आहे.