Wed, Jun 03, 2020 04:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड : आषाढी एकादशीनिमित्त शिवसेनेकडून तुळशीच्या रोपांचे वाटप!

आषाढी एकादशीनिमित्त शिवसेनेकडून तुळशीच्या रोपांचे वाटप!

Published On: Jul 12 2019 12:18PM | Last Updated: Jul 12 2019 12:11PM
महाड : प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या विठूमाऊलीचा गजर महाडमध्येही भल्या पहाटेपासून अनुभवास आला. आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध विठ्ठल मंदिरात शिवसेना व युवासेना महाड शहराच्या वतीने भाविकांना तुळशीच्या रोपांचा वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

महाड शहरात संत रोहिदास नगर, जुना पोस्ट, बाजारपेठेमध्ये विठ्ठल रखुमाईची तीन मंदिर आहेत. पहाटेपासून या तिन्ही मंदिरामध्ये काकडआरती व भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बाजारपेठेतील विठ्ठलमंदिरात शहर शिवसेनेच्या वतीने आलेल्या भाविकांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख नितिन पावले, युवा शहरप्रमुख सिदेश पाटेकर, यासह माजी नगरसेवक विलास वडके, महाड तालुका संपर्क रवींद्र उर्फ बंधू तरडे,  डॉ. चेतन सुर्वे, नानू तांबट, अनिल कांबळे, समीर कवे, सनी सावंत आदी प्रमुख पदाधिकारी हजर होते.

या अनोख्या उपक्रमासंबंधी बोलताना शहर प्रमुख नितिन पावले यांनी तुळस ही पांडुरंगाची आवडती असल्याचे स्पष्टीकरण देत शास्त्रीय तुळशीचे असाधारण महत्त्व व पर्यावरण रक्षणासाठी असलेला उपयोग लक्षात घेऊन घरांसमोर तुळशीचे रोप लावावे या उद्देशाने शहरातील भाविकांना तुळस रोपांचे वाटप एकादशीनिमित्त आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आल्याचे सांगितले.

शहरात आज दिवसभरात विठ्ठल मंदिरातून सुमारे 700 तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आल्याचे यावेळी शहर शाखेकडून सांगण्यात आले. या उपक्रमाबद्दल शहरातील नागरिकांनी तसेच विशेष करुन महिला वर्गाकडून शिवसेना कार्यकर्त्यांचे या अभिनव उपक्रमाबद्दल तसेच पर्यावरण कामी तुळशीचे असलेले महत्त्व नागरिकांसमोर मांडल्याबद्दल कौतुक होत आहे.