Mon, Jun 17, 2019 10:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुष्काळातही महाराष्ट्रात दारूचा पूर!

दुष्काळातही महाराष्ट्रात दारूचा पूर!

Published On: Jan 13 2019 1:37AM | Last Updated: Jan 13 2019 1:07AM
मुंबई : चंदन शिरवाळे

राज्यात दुष्काळ असतानाही दारुविक्री जोरात सुरु आहे. औरंगाबादमधून बीयर, पालघरमधून देशी-विदेशी तर नाशिकमधून वाईन विक्रीने ‘विक्रम’ केल्यामुळे महसुलात सुमारे 1 हजार 469 कोटी रुपयांनी भर पडल्याने राज्याचा उत्पादन शुल्क विभाग ‘टुन्न’ झाला आहे. 

राज्यात गेल्या पंधरा वर्षांपासून कोकण आणि विदर्भ वगळता पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे व संपूर्ण मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. यंदा सरकारने जवळ-जवळ निम्म्यापेक्षा अधिक महाराष्ट्र दुष्काळी जाहीर केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्यामध्ये काही गावांची भर पडणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सरकारने रोजगार हमी योजनेच्या कामात वाढ केली आहे. अशा स्थितीमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात मद्यविक्री सुरु आहे.

महाराष्ट्रात मद्यविक्री तेजीत आली असून 1 एप्रिल 2018 पासून 31 डिसेंबर 2018 पर्यंत राज्य सरकारला 10 हजार 445 कोटी रूपयांचे उत्पादन शुल्क मिळाले आहे. 2017 मध्ये याच काळात 9 हजार 76 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या उत्पन्नात सुमारे 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वित्त विभागाने 2018-19 या आर्थिक वर्षात उत्पादन शुल्क विभागाला 13 हजार 340 कोटी रूपयांचे शुल्क गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, या विभागाने 15 हजार 343 कोटी रूपयांचे लक्ष्य ठेवले. परंतु केवळ नऊ महिन्यांन उत्पादन शुल्क विभागाने 10 हजार 546 कोटी रूपयांवर झेप घेतली.  हे उत्पन्न गेल्या वर्षाच्या तुलनेत 17 टक्क्यांनी जादा आहे. त्यामुळे 15 हजार 343 कोटींचे टार्गेट पूर्ण होईल, असा विश्‍वास या विभागाला वाटत आहे.

मद्यविक्रीतून महसूल गोळा करण्यात औरंगाबाद विभाग सर्वात पुढे आहे. त्या तुलनेत उपराजधानी असलेल्या नागपुरात घट झाली आहे. डिसेंबर 2018 पर्यंत औरंगाबाद विभागातून 3 हजार 537 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी जादा आहे. नागपूर विभागातून डिसेंबर 2018 पर्यंत 367 कोटी रूपये महसूल मिळाला आहे.  गेल्या वर्षी हा आकडा 522 कोटी रूपये होता. त्यामुळे नागपूर विभागातील महसूलात गेल्या वर्षाच्या तुलनेत 29 टक्के घट झाली आहे.  

विदर्भ विभागात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक महसूल मिळाला असून त्याची वाढ सुमारे 30 टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील मद्यविक्रीतून आलेल्या महसुलातील वाढ ही 57 टक्के इतकी आहे. चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांमध्ये अकोला जिल्ह्यातून सुमारे 25 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. याच काळात गेल्या वर्षी हा आकडा 15 कोटी इतका होता.

या विभागाला डिसेंबर महिन्यात सर्वाधिक महसूल मिळाला. तिजोरीत 1425 कोटी रुपयांची भर पडली आहे. तर सर्वात कमी महसूल एप्रिल महिन्यात 959 कोटी रुपये मिळाला आहे. औरंगाबाद विभागात दारू, बिअर आणि वाईनचे अधिक कारखाने असल्याने या विभागातून सर्वाधिक महसूल मिळाला. यावर्षी नागपूर 882 कोटी रूपये, औरंगाबाद 4824 कोटी, नाशिक 2208 कोटी तर ठाणे विभागाला 2699 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.