Tue, Jul 14, 2020 02:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अजित पवारांचे नाराजीनाट्य

अजित पवारांचे नाराजीनाट्य

Last Updated: Nov 14 2019 1:55AM
मुंबई : उदय तानपाठक

सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात माशी शिंकल्याचे चित्र निर्माण झाले. समन्वय समितीच्या बैठकीआधीच राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार हे तडकाफडकी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडले आणि समन्वय समितीची बैठक रद्द झाली असून आपण बारामतीला जात आहोत, असे माध्यमांना सांगून निघून गेले. वैतागलेले अजित पवार पाहून माध्यमांनी बातम्या दिल्यानंतर खुद्द शरद पवारांनी घाईघाईत बाहेर येऊन अजित पवार मुंबईतच असल्याचा खुलासा केला.

सिल्व्हर ओक बंगल्यावर हे नाट्य घडत असताना दुसरीकडे काँगे्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निरोपाची वाट पाहात होते. मात्र काहीच निरोप न आल्याने अशोक चव्हाण यांनी समन्वय समितीची बैठक रद्द झाल्याचे  माध्यमांना सांगितले. या प्रकारामुळे खळबळ उडाली. अखेर रात्री उशिरा दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक मेकर टॉवरमधील पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

अजित पवार तसे गमतीत म्हणाले : शरद पवार

या परस्पर विधानांमुळे एकच गोंधळ उडाला असताना तिकडे शरद पवार घाईघाईत घराबाहेर आले. अजित पवार मुंबईतच असून ते उद्या तुम्हाला भेटतील, असे सांगून बारामतीला जातो, असे ते गमतीने म्हणाले असतील, असे पवार यांनी  सांगून टाकले. कुठे जातो हे सांगितले तर मीडियाच्या पाच-पंचवीस गाड्या पाठलाग करतात. त्यामुळे अजित पवार असे म्हणाले असतील. आता तुम्ही ही बातमी कशी देताय हे मी आत बसून पाहणार आहे, असे सांगून शरद पवार घरात गेले.

जितेंद्र आव्हाड यांनीही काही गोष्टी गुप्त ठेवायच्या असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेेसची  बैठक अज्ञात स्थळी सुरू झाल्याचे सांगून टाकले. राष्ट्रवादी आणि काँगेे्रसच्या नेत्यांच्या विधानांमुळे गोंधळ निर्माण झाला आणि वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या.

बैठक रद्द झालेली नाही ः जयंत पाटील

दरम्यान, या बातम्या सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोनवरून माध्यमांशी संपर्क साधला आणि समन्वय समितीची बैठक रद्द झालेली नाही, ती सुरू आहे, असा खुलासा केला. पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण आदी काँगेे्रसचे नेते या बैठकीस उपस्थित असून आपण स्वतः, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे बैठकीत सामील झालो आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. चुकीच्या बातम्या येऊ नयेत म्हणून आपण बैठकीतून बाहेर येऊन हा खुलासा करत असल्याचे ते म्हणाले. त्यावर माध्यम प्रतिनिधीने अजित पवार तुमच्या बाजूला असतील तर त्यांच्याशी बोलणे करून द्या, अशी विनंती केली, मात्र ते बिझी आहेत. त्यामुळे नंतर बोलतील, असे सांगून पाटील यांनी फोन बंद केला. हे नाट्य समन्वय समितीच्या पहिल्याच बैठकीआधी घडल्याने राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा सुरू झाली असून अजित पवार यांच्या नाराजीचे कारणही गुलदस्त्यात आहे.

संतप्‍त अजित पवार अचानक बाहेर पडले

आज सायंकाळी 7.30 वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक होणार होती. या बैठकीआधी चर्चा करण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले होते.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही तेथे होते. पक्षांतर्गत चर्चेनंतर अजित पवार समन्वय समितीच्या बैठकीसाठी जाणार होते. मात्र अचानक ते बाहेर पडले. जयंत पाटीलही त्यांच्यासोबत होते. प्रचंड वैतागलेल्या अजित पवारांचा चेहरा जांभळा झाला होता. काँग्रेसबरोबरची बैठक रद्द झाली असून मी बारामतीकडे निघालोय, असे माध्यमांना सांगून कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर न देता  ते निघून गेले. 

पद आणि जबाबदार्‍यांच्या वाटपावरून काहीतरी वाद झाल्याने अजित पवार निघून गेल्याचे सांगितले जाते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचा इन्कार केला आहे. दरम्यान, अजित पवारच नसल्याने समन्वय समितीची बैठक रद्द झाल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले असताना अचानक ही बैठक सुरू झाल्याच्या बातम्या आल्या. लगोलग बैठकीमधील नेत्यांपैकी कुणीतरी फोटोदेखील प्रसृत केले. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची आजची बैठक रद्द झाली नसल्याचे ट्विट केले. या नाट्यामुळे काही काळ मीडियावरून एकच गदारोळ सुरू होता.