Tue, Dec 10, 2019 13:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० कर्मचाऱ्यांची सुटका

वांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० कर्मचाऱ्यांची सुटका

Published On: Jul 22 2019 5:07PM | Last Updated: Jul 22 2019 6:56PM
मुंबई : प्रतिनिधी

वांद्रे पुर्वतील एमटीएनएल इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत ६० कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. अजूनही ४० कर्मचारी अडकल्याची भीती वर्तविली जात आहे. आज (ता.२२) दुपारच्या सुमारास ही आग लागली. या आगीमुळे एमटीएनएल कार्यालय आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या दाखल झाल्या आहेत. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सिडीचा वापर केला जात आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलातील जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु असून प्रथमच रोबोचाही उपयोग केला जात आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

एमटीएनल इमारतीला आग लागल्यामुळे इमारतीमधील अनेक कर्मचारी जीव वाचवण्यासाठी गच्चीवर गेले आहेत. ही आग इतकी भीषण आहे की इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर धूर पसरला आहे. यामुळे आग विझवितांना अग्निशमन दलांना अडथळा येत आहे.