Mon, Jul 06, 2020 02:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीत ४२ नवे रुग्ण

धारावीत ४२ नवे रुग्ण

Last Updated: May 26 2020 1:19AM
धारावी : पुढारी वृत्तसेवा 

धारावीत कोरोनाने धारण केलेले रौद्ररूप सोमवारी कायम असून, गेल्या चोवीस तासांत 42 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 583 झाली असून आजवर 60 जणांचा मृत्यू  या आजाराने झाला आहे. कोरोनाच्या दहशतीने रहिवाशांत घबराट पसरली असतांना, 599 जण कोरोनामुक्त झाले ही दिवसभरातील दिलासादायक बाब ठरली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या भीतीने रमजान ईदच्या दिवशीही मुस्लिम बांधवांनी घरातच थांबून खबरदारी बाळगली. धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  मनपा व आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना माटुंगा लेबर कॅम्प परिसरात कोरोनाचा कहर कायम आहे. माटुंगा लेबर कॅम्पात सलग 16 व्या दिवशीही कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या 24 तासात 8  बाधितांची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 135 झाली आहे.  त्याचप्रमाणे कुंभारवाडा 5, शाहूनगर, रजबली चाळ प्रत्येकी 2, डॉ. बालिगा नगर, साथी सोसायटी, होळी मैदान, पंचशील बिल्डिंग, मंगल कैलास बिल्डिंग, शास्त्रीनगर, भीम नगर, न्यू म्युनिसिपल चाळ, मेघवाडी, शांतीनगर, धारावी क्रॉस रोड, पीएमजीपी कॉलनी, संगम गल्ली, ढोरवाडा, प्रेम मिलन बिल्डिंग, प्रगती नगर, शेटवाडी चाळ, महात्मा गांधी सोसायटी, सोशलनगर, वैभव सोसायटी, कल्पतरू बिल्डिंग, सीता निवास सोसायटी, राजीव गांधी नगर, कोल्हापूर लेन, धारावी मेन रोड परिसरात प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. यातील कोणाचीही प्रवास हिस्ट्री न मिळाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याने या व्यक्तींना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नव्याने आढळलेल्या रुग्णांत 16 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे. धारावीत कोरोनाचा कहर पाहता राज्य शासन व मनपाने धारावीतील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून धारावी बस डेपोलागत असलेल्या पीएमजीपी कॉलनीतील मोकळ्या मैदानात 200 खाटांचे कोरोना रुग्णालयाचे काम हाती घेतले आहे.