Sun, May 31, 2020 22:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत १५६६ नवे रुग्ण!

मुंबईत १५६६ नवे रुग्ण!

Last Updated: May 24 2020 1:34AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई शहरात शनिवारी 1566 कोरोना रुग्णांची भर पडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 28 हजार 634 वर पोहोचली, तर राज्यभरातही शनिवारी  2 हजार 608 नव्या रुग्णांची भर पडली. मुंबईसह राज्यात नवे रुग्ण दाखल होण्याचा वेग अत्यंत गतिमान असून, तो कमी होण्याची चिन्हे नाहीत. शनिवारी 821 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 13 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 32 हजार 201 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

राज्यात 4 लाख 85 हजार 623 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 33 हजार 545 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. शनिवारी 60 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाल्याने मृतांची एकूण संख्या आता 1577 झाली आहे. झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये 40, पुण्यात 14,  सोलापुरात 2, वसई विरारमध्ये 1, सातार्‍यात 1, ठाणे 1 तर नांदेड शहरात 1 मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी 42 मृत्यू हे मागील 24 तासांतील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत. मृत्यूंपैकी 41  पुरुष तर 19 महिला आहेत.  

देशात सर्वाधिक, म्हणजे 1577 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचा नाकर्तेपणाच कारणीभूत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. केवळ प्रशासनाच्या हाती राज्याचा कारभार गेला असून राजकीय नेतृत्व एखादा अपवाद सोडला, तर फिल्डवर दिसत नाही. बहुतेक आमदार, नगरसेवक गायब झाले आहेत. रूग्णवाहिकांची चणचण जाणवते आहे. केवळ रुग्णवाहिका मिळाली नाही, म्हणून एका रुग्णाला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी आहे.

कोरोनाशी सुरू झालेले हे युध्दच असून ते आपण जिंकणारच, असे मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवरून वारंवार सांगितले आहे. आरोग्यसेवक जीवापाड अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र राज्य सरकारकडून या यंत्रणेला हवी तशी साधने उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या तक्रारी ठिकठिकाणाहून येत आहेत.