Fri, Jun 05, 2020 02:11होमपेज › Marathwada › कष्‍टाने फुलवलेल्‍या केळीच्या बागेवर पाण्याअभावी कोयत्‍याचे वार (व्हिडिओ) 

केळी बागेवर पाण्याअभावी कोयत्‍याचे वार (व्हिडिओ) 

Published On: May 16 2019 3:34PM | Last Updated: May 16 2019 3:39PM
वडवणी : अशोक निपटे

सुमारे तीन लाख रूपये खर्च करून टिश्यू कल्चरचे रोपे खरेदी करून लागवड केलेली केळीची बाग पाण्याअभावी करपून गेली. खूप प्रयत्‍न करूनही बाग वाचविण्यात अपयश आल्‍याने निराश झालेलया चिंचवडगाव येथील शेतकर्‍याने कोयत्याचे वार घालीत संपूर्ण बागच नष्ट करून टाकली. 

बीड जिल्हा आणि परिसरात या वर्षी तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील तलाव, विहिरी, कुपनलिका, कोरड्या पडल्याने पिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. पाण्याअभावी फळबागाही सुकू लागल्या आहेत. वडवणी तालुक्यातील चिंचवडगांव येथील प्रल्हाद गवारे या शेतकर्‍याने आपल्या शेतात चार एकर केळीची बाग लावली होती. माजलगाव धरणातून पाईपलाईन टाकून त्यांनी फळबागेसाठी पाण्याचे नियोजन केले होते. सुमारे तीन लाख रूपये खर्च करून टिश्यू कल्चरचे रोप खरेदी करून त्यांनी आधुनिक पद्धतीने केळीची लागवड केली होती.

वेळोवेळी खत, खुरपन, फवारणी व अंतर्गत मशागत करून त्यांनी बाग जोमात आणली होती. मागील वीस वर्षाचा अनुभव पणाला लावून प्रल्हाद गवारे केळीच्या बागेत रात्रंदिवस झटत होते. लागवडीनंतरही मोठा खर्च त्यांनी केला होता.  या वर्षी पंधरा ते वीस लाखाचे उत्पादन निघेल अशी आशा त्यांना होती. मात्र त्यांच्या आशेची पार निराशा झाली. या वर्षी दुष्काळ पडला. सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस न झाल्याने माजलगाव धरणात पाणीसाठा झालाच नाही. 

उपलब्ध असलेल्या पाण्यातून बीड, माजलगांव शहराला पाणी देण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले. त्‍यासाठी धरणातील मोटारी बंद करण्यात आल्‍या. यामुळे गवारे यांच्या केळीच्या बागेला पाणी मिळणे बंद झाले. योग्य मेहनत व नियोजनामुळे जोमात आलेली बाग पाण्याअभावी सुकु लागल्‍याचे पाहून प्रल्हाद गवारे हे निराश झाले. एवढी मेहनत करूनही धरणातील पाणी बंद केल्यामुळे केळीची बाग वाया गेल्याने या नैराशेतूनच मग गवारे यांनी बुधवारी सायंकाळी हातात कोयता घेऊन केळीच्या खुटावर सपासप वार घातले. ज्‍या हातांनी कष्‍टाने बाग फुलवीली त्‍याच हाताने संपुर्ण बागच भूईसफाट करताना या शेतकर्‍याचा बांध फुटला. 

विकतही मिळाले नाही पाणी

गवारे यांच्या केळीच्या बागेला माजलगांव धरणातील पाणी मिळणे बंद झाल्यानंतर बाग वाचविण्यासाठी गवारे यांनी खूपच प्रयत्‍न केले. टँकर लावून पाणी विकत घेण्याचा प्रयत्न केला मात्र कुठेच पाणी उपलब्ध झाले नाही.

पंधरा लाखांचे नुकसान 

प्रल्हाद गवारे हे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रगतशिल शेतकरी आहेत. राज्य शासन व इतर सामाजिक संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. एक अनुभवी शेतकरी या नात्याने त्यांनी  केळीच्या रोपट्यासाठी, लागवडी व मशागतीसाठी मोठा खर्च केला होता. सुमारे पंधरा लाखाचे उत्पादन निघेल अशी आशा होती. मात्र पाण्याअभावी बागच वाया गेल्याने पंधरा लाखाचा फटका गवारे यांना बसला आहे.

आर्थिक मदत देण्याची गरज

प्रल्हाद गवारे हे प्रगतशिल आणि अतिशय मेहनती शेतकरी आहेत. मोठ्या जिद्दीने त्यांनी बीड जिल्ह्यातील फळ शेती व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. मात्र निसर्गाच्या अवकृपेने धरणाचे पाणी मिळाले नसल्याने पाण्याअभावी केळीची बाग करपून गेली. नैराश्येपोटी त्यांना कोयत्याचा वार झाडावर करावा लागला. अशा नैराश्यात असणार्‍या शेतकर्‍याला शासनाने किमान दहा लाखाची आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.

चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.पाण्याअभावी केळी बागा पूर्ण पणे सुकून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. केळीच्या बागा जगविण्यासाठी शेतकरी एक हजार रुपये मोजून पाच हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर विकत घेत होते; परंतु आता विकतचे पाणीही मिळत नसल्याने केळीची बाग फळधारणा झालेल्यानंतर सुकून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. लाखो रुपये खर्च करुन हातातोंडाशी आलेल्या घास पाण्याअभावी हिसकावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून बागायती शेती करत आहे. शेतापासून पाच किलोमीटर अंतरावरील माजलगाव  धरणावरून पाईपलाईन द्वारे शेती बागायती केलेली आहे. शेतात फळपिकांची लागवड केलेली आहे.  माजलगाव धरणातील पाणी अचानक आरक्षित केल्याने पाण्याअभावी माझी पूर्ण बाग वाया गेली आहे.  लाखोंचे नुकसान मला सोसावे लागले आहे. परिसरात माझ्यासारख्या अनेक शेतकर्‍यांच्या फळबागा आहेत. त्यांना देखील हे नुकसान सोसावे लागत आहे. आज चार एकरवर केळीची बाग तोडताना ज्या वेदना मला होतात त्या असह्य वेदना आहेत. आज ही बाग उभा करण्यासाठी मला टिश्यू कल्चर रोपांसाठी व खतांसाठी साधारण तीन ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च झाला होता. उत्पन्न तर गेलेच परंतु खर्चाचे देखील पैसे माझ्या हातात आले नाहीत. अशी भूमिका केळी उत्‍पादक शेतकरी  प्रल्हाद गवारे यांनी व्यक्‍त केली.