Sun, Jun 07, 2020 08:48होमपेज › Marathwada › बीड जिल्‍ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा;शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बीड जिल्‍ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा;शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

Published On: Jun 10 2019 8:42PM | Last Updated: Jun 11 2019 1:21AM
बीड : प्रतिनिधी

जिल्‍ह्यासह ग्रामीण भागालाही सोमवारी सायंकाळी चार ते पाच दरम्यान मोठ्या प्रमाणावर वादळी वारे आणि पावसाचा तडाखा बसला. धारूर तालुक्यामधील आवरगाव, पांगरी, कोळपिंपरी, खोडास या गावातील शेतकऱ्यांना वादळी वाऱ्याने तडाखे दिले. यामध्ये पांगरी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतातील जनावरांचे गोठे, कडब्याची केलेली व्यवस्था यांचे मोठे नुकसान होऊन कित्येक जनावरे जायबंदी झाली. तर रस्त्यावर मोठ मोठी झाडे उपटून पडल्याने या भागातील वाहतूक बंद झाली.  

मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्हाभरात वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली. यातून धारूर तालुका बचावला होता. परंतु सोमवारी दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्याने या भागात हाहाकार करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तालुक्यातील आवरगाव, हसनाबाद, पांगरी, कोळपिंपरी, खोडस या गावांना  वादळी वाऱ्याच्या तडाख्यातून मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले. कित्येक शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले आहेत. 

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून याची नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. 

पाटोदा पोलिस ठाण्यात झाड कोसळले

पाटोदा शहरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. यामध्ये शहरातील अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले तर चहाचे हॉटेल व किराणा दुकानावरील पत्रे उडून छोट्या व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. 

शहरात सोमवारी सायंकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामध्ये शहरातील तर पाटील गल्ली भागातील अनेक घरावरील पत्रे उडाले. पारगाव रोड परिसरातील एका किराणा दुकानावरील पत्रे उडून पावसाचे पाणी आत शिरल्याने किराणा माल भिजून मोठे नुकसान झाले आहे.  या वादळी वाऱ्यामुळे बराच वेळ मोबाईल नेटवर्क गायब झाले होते तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. दरम्यान नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे पाटोदा महसूल प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक राजू जाधव यांनी केली आहे.