Sun, Jun 07, 2020 08:21होमपेज › Marathwada › 234 गावांत पाणीटंचाईची भीती

234 गावांत पाणीटंचाईची भीती

Published On: Dec 21 2018 1:25AM | Last Updated: Dec 20 2018 10:43PM
हिंगोली : प्रतिनिधी

ऑगस्ट महिन्यापासून पाऊस गायब झाल्याने यंदाचा उन्हाळा प्रशासनाची परीक्षा घेणारा ठरणार आहे. तब्बल 234 गावांमध्ये पाणी प्रश्‍न गंभीर होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. या गावांमध्ये जवळपास 264 टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील प्रमुख धरणातील जवळपास 18 दलघमी पाणी आरक्षित केले आहे. तसेच तब्बल 3 हजार उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 26 कोटींचा टंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

यंदा ऑगस्ट महिन्यापासूनच पावसाने पाठ फिरविली. त्यातच परतीचा पाऊसही रूसल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जानेवारी ते जून असा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी जवळपास 16 कोटीचा खर्च अपेक्षीत असून तीन हजार उपाय योजना प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये तात्पूरती पुरक नळ योजना, नळ योजना दुरूस्ती, विंधन विहिरी विशेष दुरूस्ती, नविन विंधन विहिर घेणे, खासगी विंधन विहिरी अधिग्रहीत करणे, विहिर खोलीकरण करणे, टँकरने पाणी पुरवठा करावयाचे प्रस्तावीत आहे. 26 कोटीच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकार्‍यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. 

जानेवारी ते जून या कालावधीमध्ये 234 गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने प्रशासनाने टँकरचा प्रस्ताव तयार केला आहे. जवळपास 264 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या गावपातळीवर पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जानेवारीनंतर मात्र पाणी साठे आटल्यानंतर पाणीटंचाई तीव्र होणार असल्याने टँकरशिवाय पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने टँकरच्या प्रस्तावावर प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. 

तब्बल सहा महिने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने इसापूर व सिद्धेश्‍वर धरणातील 18 दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाई गंभीर रूप धारण करणार असल्याने आतापासूनच प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या सूचनेवरून कृती टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तिन्ही पातळीवर प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.