Sun, May 31, 2020 02:26होमपेज › Marathwada › बीड लोकसभेची निवडणूक अटीतटीची

बीड लोकसभेची निवडणूक अटीतटीची

Published On: Apr 17 2019 2:08AM | Last Updated: Apr 17 2019 1:08AM
दिनेश गुळवे

बीड : यावेळची निवडणूक मॅनेज म्हणून गणली गेली होती. मात्र, दिवसेंदिवस उडालेली प्रचाराची राळ, दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या सभा, स्थानिक नेत्यांनी लावलेला जोर... यामुळे लोकसभेची निवडणूकही अटीतटीची होईल, असा अंदाज आता राजकीय विश्‍लेषकांसह सर्वसामान्य मतदारही व्यक्त करू लागले आहेत.

 बीड जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. येथे उद्योगधंदे नाहीत... रोजगाराच्या संधी नाहीत...बागाईत शेतीचे प्रमाण अधिक नाही...सिंचनाची समस्या आहे.. रेल्वे नाही.. अशा एक ना अनेक येथील समस्या आहेत. मात्र, या समस्यांचा डोंगर असला तरी जिल्ह्यातील नागरिक मात्र राजकीय जाण असलेला असून राजकारणांची त्यांना भलतीच आवड आहे. येथील मतदारांच्या या राजकीय आवडीमुळे जिल्ह्यात अनेकदा धक्‍कादायक निकाल लागले आहेत. बबनराव ढाकणे, कॉ. गंगाधरआप्पा बुरांडे अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून दिले आहे... दुसरे म्हणजे याच जिल्ह्यातील मतदारांनी डॉ. प्रीतम मुंडे यांना देशात सर्वाधिक विक्रमी मताने निवडून दिले आहे. 

अशी राजकीय संवेदनशीलता असलेल्या या जिल्ह्यात मात्र यावेळची लोकसभा निवडणूक सुरुवातीला मॅनेज म्हणून गणली गेली होती. आता भाजप व राष्ट्रवादीत सरळ फाईट होत असली तरी सुरुवातीला अमरसिंह पंडित यांची उमेदवारी न दिल्याने एकज गहजब झाला होता. मात्र, या धक्क्यातून सावरण्यात राष्ट्रवादीची घडी बसली आहे. प्रचार दरम्यान प्रचंड उलथापालथ झाली. राष्ट्रवादीचे उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर, मोहन जगताप भाजपच्या वळचणीला गेले, तर आ. विनायक मेटे, बाबूराव पोटभरे यांनी राष्ट्रवादीचा विडा उचलला. या उलथापालथीनंतर जिल्ह्यात दिग्गजांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीका करीत त्यांचे लक्तरे काढली. तर, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांनी जिल्ह्यात सभा घेत व मुक्काम ठोकत आर या पारचा इशारा दिला. 

भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे व राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे उमेदवार असले तरी ही निवडणूक पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या दोघांमध्ये प्रचारदरम्यान प्रचंड कलगीतुरा रंगला, एकमेकांवर आरोपांच्या तोफा डागल्या... एवढेच नव्हे तर प्रचार यंत्रणाही कमालीची जोरकसपणे राबविली. या सर्वांचा परिणाम सुरुवातीला मॅनेज वाटणारी निवडणूक आता अटीतटीची झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत बाजी कोण मारेल? याचे सरळ-सरळ उत्तर देणे भल्या-भल्यांना जड जात असल्याचे आजतरी दिसून येत आहे. 

परळीत प्रचंड चुरस

गेवराई मतदार संघात आ. लक्ष्मण पवार, आष्टीत सुरेश धस, माजलगावमध्ये मोहन जगताप भाजपसाठी रात्रीचा दिवस करीत आहेत, तर राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित, बीडमध्ये संदीप क्षीरसागर, माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी परळी विधानसभा मतदार संघात मात्र प्रचंड चुरस असल्याचे पहावयास मिळत आहे. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक वैयक्तिक घेतल्याने परळीत काँटे की टक्कर... असे चित्र आहे.