Fri, Jun 05, 2020 01:46होमपेज › Marathwada › स्‍मार्टफोन उठतोय मनगटाच्या जोरावर, तरूणांचे हात होत आहेत बाद 

स्‍मार्टफोन उठतोय मनगटाच्या जोरावर, तरूणांचे हात होत आहेत बाद 

Published On: May 16 2019 1:56PM | Last Updated: May 16 2019 1:16PM
केज : इक्बाल शेख 

जगात सर्वात जास्त मोबाईल वापरकर्त्यांची संख्या भारताची आहे. भारतात जवळपास 85 कोटी लोकांकडे मोबाईल फोन्स आहेत. दिवसेंदिवस नेटिझन्सची संख्या व इंटरनेट डाटा वापरणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.  व्हाट्सअॅप, फेसबुक सारख्या समाज माध्यमांमुळे व विविध मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या आकर्षणामुळे लोक मोबाईल च्या दुनियेत गुंतत चालले आहेत. यात तरुण पिढीचे प्रमाण अधिक आहे. 

आज जवळपास सर्वच तरुणांकडे महागडे स्मार्टफोन्स आहेत. या स्मार्टफ़ोनचा वापर मित्र मैत्रिणी, नातेवाईक जोडण्यासाठी आजची ही तरुण पिढी हमखास करु लागली. ज्यामुळे रात्री उशीरापर्यंत चॅटिंग व गप्पागोष्टी चालल्याने मेहनत कमी आणि आभासी दुनियेत व्यस्तता जास्त वाढू लागली आहे. यामुळे निद्रानाश, स्थुलता, लैंगिक समस्येबरोबरच पाठीच्या कण्यावर त्याचा परिणाम होऊन मनगटामध्ये तसेच बोटांमध्ये त्रास होऊ लागला आहे.

पुर्वीचे तरुण जास्त अंग मेहनत करुन शरीर मजबूत व तारुण्य टिकवून ठेवण्यात मग्न असायचे. ज्यामुळे "ज्याच्या मनगटात दम, त्याच्या शरीरात दम" असल्याचे बोलले जायचे. मात्र स्मार्टफोनवर चॅटिंगच्या अधिक वापरामुळे आजच्या तरुण पिढीमध्ये पाठदुखीचे आजार फोफावत आहेत. दिवसेंदिवस स्मार्टफोनचे आकार वाढत आहेत. त्याचा भार हाताला व त्याच्या बोटांवर जास्त पडत असल्याने मनगटाच्या हाडावर याचा थेट परिणाम होत आहे. ज्यामुळे मानेचे व पाठीचे आजारही होण्याची शक्यता जास्त आहे. 

तरुण पिढीने याकडे दुर्लक्ष न करता आपल्या शरीराकडे व आपल्या प्रकृतीकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आज प्रत्येकजण आपल्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त दिसत आहे. ज्यामुळे आपल्या आसपासच्या परिसरात काय चालले आहे याकडे कोणाचेही लक्ष राहीलेले नाही. 

मोबाईल फोनच्या नादात अनेक दुर्घटनाही घडलेल्या आहेत. याउलट काही अपघात झाले तर लोक त्या अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी त्याचे व्हिडिओ शुट करण्यात मग्न असतात. मोबाईलच्या या अति वापरामुळे आपले आयुष्य व वेळ कमी करण्यापेक्षा त्याचा मर्यादित वापर करणे हे आजच्या काळातील तरुणांना खुप गरजेचे आहे.

काय म्हणतात डॉक्‍टर... 

सतत स्मार्ट फोन वापरल्याने शरीरातील सर्व्हाईकल स्पॉन्डीलाईटीस चे प्रमाण जास्त वाढत आहे. ज्यामुळे पाठीच्या कण्याचे आजार तरुणपीढीमध्ये जास्त पहावयास मिळत आहे. सेल फोनच्या रेडिएशन्समुळे डोक्याचे टीशुज आणि हाडांची उष्णता 2°F पर्यंत तापवू शकते. ज्यामुळे या उत्सर्जनांचा संपर्क हाडांमध्ये होऊन संवेदना होऊ शकतात. दीर्घ काळामध्ये कदाचित हे अधिक कायमचे नुकसान होऊ शकते. 

डॉ. सुरेश मुंडे, अस्थिरोग तज्ञ, बीड