Mon, Jun 01, 2020 17:57
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › विड्‍यात गाढवावर निघाली जावई बापूंची मिरवणूक

विड्‍यात गाढवावर निघाली जावई बापूंची मिरवणूक

Published On: Mar 23 2019 1:15AM | Last Updated: Mar 22 2019 8:59PM
बीड : प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील  विडा ( ता.केज) या  गावाची परंपरा जरा निराळीच आहे. या गावातील लोक धुलीवंदनाच्या दिवशी गावातील जावयाची चक्क गाढवावरुन  धिंड काढतात. निझाम काळात सुरु झालेली ही परंपरा मोठ्‍या उत्‍साहात आजही पार पाडली जाते. जावई ही या परंपरेला मान देऊन स्वखुशीने या प्रथेत सहभाग घेतात. 

यंदा विड्याच्या तरुणांना जावयाच्या शोधा इतकीच कसरत गाढव शोधताना झाली आहे, हे मात्र विशेष आहे. यंदा गावातील सावळराम पवार यांचे शिंधी (ता. केज) येथील जावई बंडू पवार यांना यंदाच्या गदर्भ सवारीचा मान मिळाला. सुरुवातीला नाही नाही म्हणणारे बंडू पवार नंतर मेहुण्यांच्या आनंदात ऐवढे समरस झाले की मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनीही डॉल्बीच्या गाण्यांवर ठेका धरला. 

निझाम राजवटीत जहागीरदारीचे गाव होते. साधारण 82 वर्षांपूर्वी तत्कालिन जहागिरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे जावई ऐन धुलीवंदनाच्या दिवशी विड्याला आले होते. त्यावेळच्या तरुणांनी मालकाच्या जावयाची चेष्टेत गाढवावरुन मिरवणूक काढली आणि तेव्हापासून ही गावचीच परंपरा झाली. विड्याच्या सर्वच पिढ्यातील तरुणांनी ही परंपरा अखंडपणे सुरु ठेवली आहे. विशेष म्हणजे, जावई मिरवणुकीवरुन एकदाही साधी कुरबुर देखील झालेली नाही. सर्वच जाती - धर्मांच्या मंडळींचा मिरवणुकीत सहभाग असतो.

गाढव शोधताना युवकांची दमछाक

पूर्वी गावात मोठ्या प्रमावर गाढवं असायची. झाप, दुरड्या बनविण्याचा पारंपारिक व्यवसाय करणारी मंडळी फोक वाहतूक करण्यासाठी गाढवं पाळत. काळाच्या ओघात आता हा व्यवसाय बंद झाल्याने गाढवं पाळणंही बंद झाल. तरीही पारंपारिक ओळख म्हणून जीवन गायकवाड यांच्याकडे अनेक वर्ष गाढव होती. मात्र, अपघाताने त्यांचे गाढवही मरण पावल्याने यंदा जावयाईतकीच गाढव शोधण्याची कसरत विडेकरांना करावी लागली. शेवटी हिवरापहाडी येथून भाड्याने गाढव युवकांना आणावे लागले