होमपेज › Marathwada › उमरगा : सावळसूर येथे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

उमरगा : सावळसूर येथे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: Nov 14 2017 7:47PM | Last Updated: Nov 14 2017 7:47PM

बुकमार्क करा

उमरगा : प्रतिनिधी

उमरगा तालुक्यातील सावळसुर येथे एका तरूण शेतकऱ्याने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मंगळवार, दि. 14 रोजी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उमरगा तालुक्यातील मयत शेतकरी शिवशंकर राम बिराजदार (वय 35 वर्षे) यांना सावळसुर शिवारात सर्वे नंबर 82,89,90 मध्ये 1 हेक्टर 22 आर व वडील राम महादेव बिराजदार (वय 90 वर्षे) यांची सर्वे नंबर 82 ,116 मध्ये 1 हेक्टर 80 आर. शेती आहे. मयत शिवशंकर यांच्या नावावर 20 हजार रूपयांचे तर वडीलांच्या नावावर 80 हजाराचे राष्ट्रीयकृत बँकेचे शेतीसाठी घेतले .कर्ज होते. तसेच तीन दिवसापुर्वी वडीलांच्या नावावरील शेतीचे 1 लाख 80 हजार 220 रूपयांचे वीज बील आल्याने ते चिंताग्रस्त होते. यातूनच शेती मधील नापिकी, थकलेले वीज बील व शेतीच्या कर्जाला कंटाळून सावळसुर शिवारातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन शिवशंकर यांनी आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. मयत शिवशंकर यांच्या पश्चात वृद्ध वडील राम बिराजदार (वय 90वर्षे), पत्नी ज्योती (वय 34वर्षे), कल्लेश्वर (वय 17वर्षे) व मनोज (वय 15 वर्षे ) ही दोन लहान मुले आहेत. घरातील कर्ता पुरूष निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील व तलाठी हणमंत जमादार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी मयत शिवशंकर बिराजदार यांचे भाऊ अंकुश बिराजदार यांनी दिलेल्या माहितीवरून उमरगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि भिकुलाल वडदे हे करीत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत शिवशंकर व वडील राम बिराजदार यांनी कर्ज माफीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. या योजनेतील ग्रीन लिस्ट मध्ये फक्त वडीलांचे नाव आहे. मात्र मयत शिवशंकर यांचे कर्जमाफी च्या ग्रीन लिस्ट मध्ये नाव नाही.