Sat, Jun 06, 2020 15:13होमपेज › Marathwada › राहुलबाबा तुमची हटली सामान्यांची गरिबी कधी हटवणार?: उद्धव ठाकरे

राहुलबाबा तुमची हटली सामान्यांची गरिबी कधी हटवणार?: उद्धव ठाकरे

Published On: Apr 09 2019 4:09PM | Last Updated: Apr 09 2019 4:09PM
लातूर: पुढारी ऑनलाईन

 तुमच्या पणजोबा पासून ते तुमच्या मातोश्रीपर्यंत सर्वांनी गरिबी हटावचा नारा दिला. या नार्‍याने तुमची गरिबी हटली परंतु सामान्य जनतेची गरिबी कधी हटवणार?,असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना औसा येथील प्रचारसभेत लगावला.

 तसेच ते म्हणाले,  काँग्रेसचा जाहीरनामा हा केवळ थापा आहेत.  तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन दूध पाजणारं सरकार पाहिजे?" असा सवाल जनतेला ठाकरे यांनी केला.

याउलट महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी केंद्रस्थानी आहे. राम मंदिराचा संकल्प आहे, राष्ट्रहिताची साक्ष आहे; आम्हाला जे हवे होते तेच या जाहीरनाम्यात असल्याने आम्ही युती केली आहे. देशाचा शत्रू असलेल्या पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन तेथील अतिरेक्यांना ठोकले आहे. पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर त्याचे नामोनिशान राहणार नाही अशी उपाययोजना करा अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.

 मराठवाडा ही संतांची भूमी आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहिल्याने इथली रझाकारी गेली. तथापि आज हा भूभाग  दुष्काळासारख्या अस्मानी संकटाखाली चेपला गेला आहे. हे संकट दूर करण्यासाठी मराठवाड्याच्या पाठीशी आपण उभे राहा अशी विनंती ठाकरे यांनी यावेळी मोदींना केली. 

पिक विम्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या घामाचा पैसा लावला आहे तथापि कंपन्या कडून शेतकऱ्याची फसगत होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा कंपन्यांना वठणीवर आणा व प्रत्येक जिल्ह्यात विमा कंपनीचे कार्यालय करा  अशीही मागणी ठाकरे यांनी केली.