Thu, Jun 04, 2020 13:23होमपेज › Marathwada › बुलडाण्यात बंद कारमध्ये गुदमरून २ बालकांचा मृत्यू

कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू

Published On: Jul 16 2019 10:43AM | Last Updated: Jul 16 2019 10:54AM
बुलडाणा : प्रतिनिधी

शहरातील गवळीपुरा भागातील अंगणवाडीत सोमवारी सकाळी गेलेली 3 बालके बेपत्ता झाली होती. त्यांचे अपहरण झाले असल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्‍यामुळे याची तक्रार शहर पोलिस स्‍टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतला असता, गवळीपुरातील एका बंद स्‍थितीतल्‍या कारमध्ये ही बालके मृतावस्‍थेत आढळली.

या विषयी अधिक माहिती अशी की, गवळीपुरा भागातील अंगणवाडीमध्ये शिकत असलेली शे. अजीम शे. समीर (वय३), शे.  साहिल शे. जमील (५), कु. सहर शे. हमीद (४) ही बालके काल (सोमवारी) अंगणवाडीमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र काल सोमवारपासून ही तीनही बालके घरी परतली नव्हती. त्‍यामुळे कुटुबियांनी याची माहिती पोलिसांना कळवली होती. 

यावरून पोलिसांनी या बालकांचा शोध सुरू केला होता. शहर पोलिसांनी गवळीपुरा भागाच्या नगरसेवकांच्या सहकार्याने प्रत्येक घरात बालकांचा शोध घेतला परंतू ही बालके सापडू शकले नाहीत. यामुळे अफवांचे पेव फुटले होते. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. 

दरम्यान सोमवारी उत्तर रात्री २ वाजण्याच्या सुमारास गवळीपु-यात बंद  स्थितीत असलेल्या कारमध्ये पोलिसांनी  टॉर्च च्या साहाय्‍याने बघितले असता, एका बालिकेची हालचाल दिसली. यावेळी पोलिसांनी तात्‍काळ कार उघडून बघितले असता,  शे. अजीम शे. समीर (वय ३), शे. साहिल शे. जमील (५) ही दोन मुले मृतावस्थेत आढळली, तर कु. सहर शे. हमीद (४) ही बालिका अत्यवस्थ अवस्‍थेत आढळली.

बंद कारमध्ये गुदमरल्याने हा प्रकार घडला असल्याचे प्राथमिक अनुमान आहे. या घटनेतील अत्यवस्थ बालिकेवर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेविषयी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.