Sun, May 31, 2020 03:29होमपेज › Marathwada › आष्टीत देवीच्या पलंगाच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर 

आष्टीत देवीच्या पलंगाच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर 

Published On: Oct 16 2018 10:28AM | Last Updated: Oct 16 2018 10:28AMआष्टी : प्रतिनिधी

घोडेगाव (ता. आंबेगाव, जिल्हा, पुणे)  येथून श्री क्षेत्र तुळजापूरकडे निघालेल्या तुळजाभवानी देवीच्‍या मानाच्‍या पलंगाचे आष्टी शहरात सकाळी आगमन झाले. यावेळी या पलंगाच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी भक्तांचा महापूर लोटला.

सुमारे आठशे वर्षापूर्वीची यादव कालीन परंपरा असलेल्या देवीचा हा पलंग साग आणि आंब्याच्या लाकडपासून तयार करण्यात येतो. या पलंगाचे ऋषीपंचमीला तुळजापूरकडे प्रस्थान सुरु होते. घोडेगाव, जुन्नर, आळेफाटा, अहमदनगर, चिचोंडी, पुंडी, वाहिरा, खुंटेफळ, लोणी, वाटेफळ, आष्टी, जामखेड, तुळजापूर असा या पलंगाचा प्रवास असतो. अहमदनगर येथील बाबूराव पलंगे, गणेश पलंगे हे या पलंगाचे मालक आहेत. भाद्रपद पौर्णिमेला हा पलंग मार्गस्थ होतो. आष्टी शहरात आज या पलंगाचे आगमन झाले. शहरातील कसबा पेठेत हरिभाऊ एकशिंगे, अशोक एकशिंगे, देविदास एकशिंगे यांच्या निवासस्थानी या पलंगाचे स्वागत झाल्यानंतर तो दर्शनासाठी उभा केला. एकशिंगे कुटुंबियांची ही आठवी पिढी आहे. प्रत्येक ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. घटस्थापनेच्या सातव्या माळेला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आष्टी शहरात हा देवीचा पलंग पोहचतो. नंतर जामखेड मार्गे तुळजापुरला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पोहचत असल्याची माहिती पलंगाचे चालक पलंगे यांनी दिली. तुळजापुरला पलंग पोहचल्यानंतर विजयादशमी ते कोजागीरी पौर्णिमे पर्यंत या पलंगावर तुळजाभवानी माता निद्रा घेते अशी अख्यायिका आहे. नंतर हा पलंग होममध्ये विसर्जीत केला जातो.