Sun, Jun 07, 2020 15:09होमपेज › Marathwada › संपाचे हत्यार उगारताच कामगारांना वेतनवाढ

संपाचे हत्यार उगारताच कामगारांना वेतनवाढ

Published On: Nov 08 2018 1:26AM | Last Updated: Nov 08 2018 1:26AMतुळजापूर ः तालुका प्रतिनिधी

तुळजाभवानी मंदिर संस्थानने ऐन दिवाळीत दोन महिन्यांचे वेतन दिले नसल्यामुळे तसेच सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा व स्वच्छतेसाठी नियुक्‍त 262 कंत्राटी कामगारांनी मंगळवारी अचानक संपाचे हत्यार उपसले. बुधवारी मंदिर व्यवस्थापन समितीने एक हजार रुपयांची पगारवाढ देण्याची घोषणा केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा तसेच स्वच्छतेसाठी मागणीनुसार कामगार पुरवण्याचे कंत्राट मुंबई येथील क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे. मंदिरात सुरक्षा पुरुष कर्मचारी 150 व महिला 27, स्वच्छता कर्मचारी 70 व महिला 15 असे कर्मचारी कार्यरत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावरच या कंपनीच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी अचानक काम थांबविले. मंदिर संस्थानने तातडीने हालचाली करीत महत्त्वाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांच्या नेमणुका केल्या. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनीही मंदिरात भेट देऊन पाहणी केली. पोलिस कर्मचार्‍यांच्या नेमणुका केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, कामगारांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच दिले आहे. त्यांच्या संपामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

यापूर्वीही केले होते आंदोलन

या कर्मचार्‍यांना महिना 10 हजार 100 रुपये वेतन आहे. या वेतनात वाढ करावी, अशी मागणी होती. पेमेंट स्लिप द्यावी, भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची माहिती देण्यात येत नव्हती. अशा अनेक मागण्यांसाठी यापूर्वीही अनेकदा कामगारांनी आंदोलने केली आहेत. मात्र, प्रशासनाने कोणतीही दखल न घेल्याने मंगळवारी सकाळी कामगारांनी थेट कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. हे आंदोलन रात्रीपर्यंत सुरू होते. बुधवारी झालेल्या बैठकीत कंपनीचे प्रबंधक रवींद्र लायगुडे यांनी एक हजार रुपयांची पगारवाढ देण्याची घोषणा केली. यानंतर कामगार कामावर पूर्ववत रुजू झाले. कामबंद आंदोलनामुळे सुरक्षारक्षकांअभावी दर्शन रांगेत विस्कळीतपणा आला. भक्‍तांना नाहक त्रास सहन करावा लागला. सुरक्षारक्षकांअभावी मंदिर परिसराची सुरक्षा मंगळवारी ‘राम भरोसे’ होती. 

या वादात मंदिर प्रशासनाचा काहीही संबंध नाही. मंदिर प्रशासन कर्मचार्‍यांची थेट नियुक्‍ती करू शकत नाही. कामगार व कंपनी या दोघांत वाद होता. तो आज मिटला आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही.
- आर. व्ही. गमे, जिल्हाधिकारी