Mon, Jul 06, 2020 18:30होमपेज › Marathwada › दोन उपकार्यकारी अभियंते निलंबित

दोन उपकार्यकारी अभियंते निलंबित

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 11:28PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

थकबाकी वसूल करण्यात टाळाटाळ करणार्‍यांविरुद्ध महावितरणने कारवाईचे हत्यार उपसले आहे. या कारणांवरूनच जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील उपकार्यकारी अभियंता व्यंकट गांधलेे व दुसर्‍या एका अधिकार्‍यास निलंबित करण्यात आले असून आणखी दोन अधिकारी रडारवर असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. 

वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ज्या ग्राहकांकडे दहा हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे अशा थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही दोन उपकार्यकारी अभियंत्यांनी आपल्या परिसरातील थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केला नाही अशा दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील व्यंकट गांधले आणि अन्य  एका उपकार्यकारी अभियंत्याचा समावेश आहे. अजून दोन अभियंत्यांनी आपल्या कामात कसूर केल्याप्रकरणी ते आमच्या रडारवर आहेत, अशीही माहिती गणेशकर यांनी दिली.

अनेक ग्राहकांच्या घराचा पत्ता चुकलेला आहे. तर अनेक ग्राहक महावितरणला सापडत नाहीत. त्यामुळे आता महावितरण कंपनीने शहरातील ग्राहकांचे पत्ते अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहकांकडून सध्याचा पत्ता, कायमचा पत्ता, मोबाइल नंबर, आधार कार्ड नंबर व इतर माहिती भरून घेतली जात आहे. यापुढे सुधारित पत्त्यावरच वीज बिल देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी पत्ता अपडेट करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

विभागवार काम वाटप
महावितरण कंपनीचे शहरात आठ उपविभाग आहेत. यापूर्वी प्रत्येक विभाग बिल दुरुस्ती, ट्रान्स्फॉर्मर  दुरुस्ती,  वीज बिल वसुली, वीज बिल तयार करण्याचे काम करत होते. मात्र  ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी आता आठ उपविभागांची विभागणी करण्यात आली आहे. चार उपविभाग हे ट्रान्स्फॉर्मरसह इतर दुरुस्तीचे काम करेल, तर दुसरे चार उपविभाग हे बिल दुरुस्ती, वसुली व या संबंधी इतर कामे करणार आहेत. यामुळे कामात सुसूत्रता येऊन ग्राहकांना चांगली सेवा देता येणार आहे.