Mon, Jun 01, 2020 18:58
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › शृंगारे-कामत यांच्यामध्येच खरी लढत

शृंगारे-कामत यांच्यामध्येच खरी लढत

Published On: Mar 30 2019 1:30AM | Last Updated: Mar 29 2019 9:18PM
लातूर लोकसभा मतदारसंघात भले डझनभर उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली असली तरी खरा सामना काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांत रंगला आहे. प्रचारात भाजपने आघाडी घेतली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर व आमदार अमित देशमुख यांची संयुक्त पत्रकार परिषद वगळता काँग्रेसने मतदारसंघात एकही मोठा कार्यक्रम घेतल्याचे ऐकिवात नाही. भाजपने मुंबई येथील बिल्डर सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने पुण्यातील उद्योजक मच्छिंद्र कामत यांना त्यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे. भाजपने पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तगडे नियोजन केले असून प्रचाराची एक फेरी पूर्णही झाली आहे. उमेदवारी अर्ज भरताना केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले होते. याउलट काँग्रेसने उमेदवार निवडण्यात मोठा वेळ खर्ची घातला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाट व नेत्रतज्ज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांची नावे चर्चेत असताना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून काँग्रेसवासी झालेले मच्छिंद्र कामत यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. 

काँग्रेसच्या उमेदवाराबाबत काँग्रेसमध्येच दोन मतप्रवाह असल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे संयुक्त पत्रकार परिषदेत खुद्द शिवराज पाटील-चाकूरकर यांनी कामत यांचा काही वेळापूर्वी परिचय झाला असल्याचे सांगितल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. असे असले तरी त्यांची उमेदवारी ही काँग्रेसजनांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाली आहे. उमेदवाराची श्रीमंती केंद्रस्थानी ठेवून भाजप व काँग्रेसने उमेदवार निवडल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. परजिल्ह्यात बस्तान असलेले हे उमेदवार स्थानिक कसे, असा प्रश्‍न इच्छुक उपस्थित करत आहेत.

भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे चाकूर तालुक्यातील घरणी गावचे रहिवासी असून ते मुंबईतील प्रथितयश बिल्डर आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे ते सदस्य असून, गेल्या दोन वर्षांपासून विविध कामे व कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संपर्क ठेवला आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांचे ते खंदे समर्थक असून, अहमदपूरचे आमदार विनायकराव पाटील यांचाही त्यांना पाठिंबा आहे. विशेष म्हणजे संभाजीराव विरोधी गटांचाही त्यांना आशीर्वाद आहे. शांत व संयमी स्वभावामुळे त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. असे असले तरी विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह काही इच्छुकांची नाराजी त्यांना अडसर ठरू शकते.

काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत हे उदगीर तालुक्यातील कासराळचे रहिवासी असून ते पुण्यातील प्रथितयश उद्योजक आहेत. त्यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उदगीर विधानसभेची निवडणूक लढवली होती. उदगीर मतदारसंघात त्यांचा चांगला परिचय आहे. गटा-तटाचे राजकारण न झाल्यास त्यांची उमेदवारी प्रतिस्पर्ध्याला आव्हानात्मक ठरू शकते.