Thu, Jun 04, 2020 23:42होमपेज › Marathwada › दोघींना पळवून नेणार्‍या तिघांना घेतले ताब्यात

दोघींना पळवून नेणार्‍या तिघांना घेतले ताब्यात

Published On: May 29 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 10:51PMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

नांदेड येथून वाशीम येथे कंपनीत नोकरीस लावतो म्हणून दोन महिलांची फसवणूक करणार्‍या तिघांना आखाडा बाळापूर पोलिसांनी  सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास ताब्यात घेऊन वजीराबाद पोलिस ठाण्यात रवाना केले. या घटनेत बसचालकाचे प्रसंगावधान व बाळापूर पोलिसांनी सतर्कता दाखविल्यामुळे दोन महिलांना पळवून नेण्याचा डाव फसला.

नांदेड येथील दोन महिलांना सोमवारी सकाळी 10.30 च्या सुमारास एका महिलेने संगनमत करून पुडे बनविण्याच्या कंपनीमध्ये नोकरी देण्याचे सांगत मुस्ताक शहा कुर्बान शहा, वय 35 धंदा - मजुरी, रा. दावतखेजी, ता. जि. मससोळ मध्यप्रदेश, उत्तमसिंह किशोरसिंह, वय 25, रा. गुडलाराम, ता. जावरा, जि. रतलाम मध्यप्रदेश व सुमेरसिंह बागसिंह भायल, रा. गुडशिवाल, जि. बडमोहर, राजस्थान या तिघांनी हिंगोली गेटहून नांदेड-अकोला बसमध्ये बसवून दिले. बस डोंगरकडा येथे आल्यानंतर सुमेरसिंह भायल याने

तुमच्यासोबत आम्ही लग्‍न लावणार आहोत, त्यामुळे तुम्हाला पळवून नेत आहो, असे सांगितल्यानंतर त्या महिलेने तत्काळ चालकास या घटनेबाबत माहिती देताच बसचालकाने बस थेट आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणली. तेथे हजर असलेले पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी महिलांची आपबित्ती ऐकून घेत तिघांना ताब्यात घेतले.

तसेच हा प्रकार नांदेड येथे घडला असल्यामुळे या प्रकरणाची नोंद नांदेड येथील वजीराबाद पोलिस ठाण्यात करण्यासाठी दोन महिलांसह तिघांना आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी हकीम, शिंदे, दळवी, मडावी यांच्यासोबत रवाना केले. मागील काही वर्षांपासून नांदेड येथून ऑन्टीमार्फत महिला व मुलींना फुस लावून परराज्यात विक्री करण्याचे प्रकार वाढले आहे. हा प्रकारही तसाच असल्याचा संशय आखाडा बाळापूर पोलिस ठाणयचे पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी व्यक्‍त केला आहे.