Thu, Jun 04, 2020 22:26होमपेज › Marathwada › वडिलांच्या उपचारासाठीची रक्कम चोरट्यांनी लांबवली

वडिलांच्या उपचारासाठीची रक्कम चोरट्यांनी लांबवली

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:20PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

वडील आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी बँकेतून काढलेले 50 हजार रुपये गुरुवारी दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी लांबवले.  

तालुक्यातील उजनी येथील शेतकरी किरण शाहूराव गायकवाड यांनी वडील आजारी असल्याने उपचारासाठी एसबीआय बँकेतून गुरुवारी 50 हजार रुपये काढले होते. बँकेतून ठोक रक्कम न देता चिल्लर दिल्याने त्यांनी ती रक्कम पिशवीत ठेवून पिशवी मोटारसायकलच्या (एम एच 44 एन 2657) डिक्कीत ठेवली आणि गावाकडे निघाले. मोंढा रस्त्यावर एका दुचाकी शोरूमच्या अलीकडील मोकळ्या जागेवर गाडी उभी करून ते लघुशंकेसाठी गेले. तेवढ्याच वेळात चोरट्यांनी संधी साधून गाडीच्या डिक्कीतील 50 हजार रुपये ठेवलेली पिशवी लांबविली आणि पसार झाले. वापस आल्यानंतर किरण गायकवाड यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी चोरट्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ते सापडले नाही. अखेर अंबाजोगाई शहर ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.

दहा दिवसांतील तिसरी घटना

अंबाजोगाईतील मोंढा रस्त्यावर गाडीतून पैसे चोरीला जाण्याची मागील दहा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. चोरटे बँकातच थांबून लक्ष ठेवतात आणि मोठी रक्कम काढलेल्या व्यक्तींचा पाठलाग करतात. शक्यतो आजूबाजूच्या गावातून आलेले ग्रामस्थ मोंढ्यात चहापाणी अथवा इतर खरेदीसाठी कुठे ना कुठे थांबतातच. नेमकी हीच संधी साधून गाडीतून पैसे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. 

बँकांच्या भूमिकेचा  फटका 

बँकांकडून सर्वसामान्य ग्राहकांना दहा, वीस रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात रक्कम दिली जात अशा तक्रारी ग्राहकांतून होत आहे. बँकांनीच जर ठोक रक्कम दिली तर आजूबाजूंच्या गावातून येणार्‍या ग्राहकांना ते सोयीचे आणि सुरक्षित ठरेल असे  बँक ग्राहकांचे म्हणणे आहे. 

ग्राहकांचे दुर्लक्ष

बँकेतून रक्कम घेतल्यानंतर काही बँक ग्राहक अधिक बिनधास्तपणा दाखवतात. गाडीच्या हँडलला पैसे असलेली पिशवी लावणे, डिक्कीत रक्कम ठेवणे असे प्रकार तर नियमित करतात. शिवाय मोठी रक्कम ही घरी अथवा निश्‍चित जागेवर नेण्यापूर्वी मध्येच गाडी थांबून हॉटेल गाठणे, मित्रांशी गप्पा मारताना रक्कमकडे दुर्लक्ष करणे आदी प्रकारांमुळे चोरट्यांना देखील अनेकदा संधी मिळते.