Sun, Oct 20, 2019 17:46होमपेज › Marathwada › तिजोरी न तुटल्याने १६ लाख वाचले

तिजोरी न तुटल्याने १६ लाख वाचले

Published On: Jun 03 2018 1:15AM | Last Updated: Jun 02 2018 11:15PMशिरूर : प्रतिनिधी

तालुक्यातील खालापुरी येथील बाजारतळावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेच्या दरवाजाचे लोखंडी ग्रील उचकटून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला होता. स्ट्राँगरूम तोडून रक्कम लंपास करण्याचा त्यांचा मानस होता, मात्र सुदैवाने तिजोरी न तुटल्याने हा प्रयत्न फसला. तिजोरीत 16 लाख  41 हजार रुपये होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बँकेचे मॅनेजर सी. व्ही. धसे यांनी या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

खालापुरी येथे बाजारतळावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्मचार्‍यांनी कुलूप लावून बँक बंद  केली. त्यानंतर रात्री चोरट्यांनी बँकेच्या समोरील सायरन अलाराम बंद केला. समोरचा दरवाजा आणि त्याचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. बँकेतील कॅश जमा असलेल्या स्ट्राँगरूमपर्यंत ते पोहोचले. गॅस कटरचा वापर करून त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु गॅसकटर वापरूनही तिजोरी न तुटल्याने चोरट्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. या तिजोरीत 16 लाख 41 हजार रुपयाची रोकड शिल्लक असल्याची माहिती शाखा व्यवस्थापका कडून देण्यात आली.

बँकेतील काहीही चोरीला गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण बँकेचे क्षेत्रिय व्यवस्थापक मुळे, आष्टीचे उपअधिक्षक अभिजित पाटील व शिरूर पोलिस स्टेशनचे सपोनि महेश टाक यांनी तात्काळ धाव घेतली होती. सध्या परिसरात भुरट्या चोर्‍याचे देखील प्रमाण वाढल्याने रात्रीच्या वेळी पोलिसांकडून अवलंबण्यात येणार्‍या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.