Thu, Jun 04, 2020 12:39होमपेज › Marathwada › दुचाकी, सायकलवर फेरी काढत पाठिंबा

दुचाकी, सायकलवर फेरी काढत पाठिंबा

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 12:19AMबीड : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणासाठी जवळपास गेल्या वीस दिवसांपासून परळी येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून आता तहसीलवर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी आष्टी येथे आ. भीमराव धोंडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. तर, केजमध्ये आंदोलकांना तालुक्यातील गावांमधून भाजी-भाकरी दिली जात आहे. बीडमध्ये मंगळवारी पाच हजार तरुण रक्तदान करणार आहेत. तर, परळी येथील आंदोलकांना तरुणांनी सायकल रॅली काढून पाठिंबा दिला, दरम्यान या आंदोलनास शासकीय कर्मचारीही आंदोलन करून पाठिंबा देणार असल्याचे निवेदन पाटोदा येथे देण्यात आले आहे, तर बीडमध्ये आज सोमवारी (दि.6) महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, याची समन्वयकांनी जोरदार तयारी केली आहे. शासनाने मेगाभरती स्थगित केल्याच्या निर्णयाचे परळीतील आंदोलकांनी स्वागत केले.

समाजाला आरक्षणाची गरज ः धोंडे

आष्टी :  मराठा समाजासह मुस्लिम आणि धनगर समाजाला देखील आरक्षण मिळणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. भीमराव धोंडे यांनी केले. आरक्षणाची मागणी रास्त असल्याचे सांगत या आंदोलना दरम्यान युवकांनी आपली जीवनयात्रा संपविणे हे उचित नसून आरक्षणाबाबत सरकार अनुकूल असल्याचे ते म्हणाले. आष्टी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात ते बोलत होते. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्‍नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवून रविवार (दि.5) रोजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी.आ.साहेबराव दरेकर,अशोक साळवे, वाल्मीक निकाळजे, सतीश शिंदे, संतोष चव्हाण, बाबूराव केदार, अरुण निकाळजे, संजय सानप, काकासाहेब लांबरूड, सुरेश माळी,दादासाहेब झांजे, बाबासाहेब बांगर, विष्णूपंत वायभासे, राधाकिसन ठोंबरे, उद्धव शिरसाट, जालींदर वांढरे, दादासाहेब जगताप, प्रदीप वायभासे, पोपट गोल्हार, छगन तरटे, सीताराम पोकळे, बबनराव सांगळे आदी उपस्थित होते.

महिलांच्या मोर्चाची जोरदार तयारी

बीड ः मराठा समाजास आरक्षण द्यावे, मेगा भरती रद्द करावी, मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्‍न सोडवावा, कोपर्डीच्या आरोपींना शिक्षेची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी आज सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. मल्टिपर्पज ग्राउंडवरून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून या मोर्चास सुरुवात करण्यात येणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येऊन तेथे निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चा यशस्वी करण्यासाठी समन्वयकांनी रविवारी जोरदार तयारी केली आहे.

केजमध्ये तिसर्‍या दिवशीही ठिय्या 

केज : मराठा आरक्षणासाठी येथे सुरू असलेले ठिय्या आंदोलन तिसर्‍या दिवशीही सुरूच अहे. आरक्षण जाहीर झाल्याशिवाय आता माघार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. रविवारी केज तालुक्यातील शिक्षक बांधवानी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत आपला पाठिंबा जाहीर केला. 

आंदोलनकर्त्यांना उमरीकरांची भाजी भाकरी 

रविवारी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना तालुक्यातील उमरी येथील ग्रामस्थांनी भाजी भाकरी देऊन गावकर्‍यांनी पाठिंबा दिला. आरक्षण मिळेपर्यंत आता माघार नाही अशी भूमिका यावेळी उमरी गावातून आलेल्या ग्रामस्थ व तरुणांनी बोलून दाखवली.