Sun, Jun 07, 2020 09:19होमपेज › Marathwada › ऊसतोड मजुरांच्या नोंदणीसाठी कर्मचारी फडावर

ऊसतोड मजुरांच्या नोंदणीसाठी कर्मचारी फडावर

Published On: Dec 11 2018 1:42AM | Last Updated: Dec 10 2018 11:45PM
बीड : उदय नागरगोजे

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना लागू केली. या योजनेसाठी कामगार विभागामार्फ त सध्या ऊस फडावर जाऊन नोंदणी केली जात आहे. 19 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला असून राज्यभरात अद्यापपर्यंत केवळ 7 हजार 780 कामगारांची नोंदणी झाली आहे. ऊसतोड मजुरांची मोठी संख्या पाहता नोंदणीसाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या कल्याणासाठी मोठे काम केले. यामुळे ऊसतोड कामगारांसाठी त्यांच्या नावाने योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत कामगार विभागामार्फ त राज्यभरात नोंदणी अभियान राबवण्यात येत असून भल्या सकाळीच कर्मचारी ऊस फ डावर जाऊन मजुरांची माहिती घेत आहेत. नोंदणीसाठी अर्ज, पासपोर्ट फोटो, आधार कार्डची झेरॉक्स, बँकेचे पासबुक एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, परंतु ही कागदपत्रे मजुरांकडे नसल्याने ती जमा करण्यासाठी कर्मचार्‍यांना पुन्हा एकदा फडावर जावे लागत आहे. एका कामासाठी दोन-दोन वेळेस चकरा माराव्या लागत असल्याने साहजिकच याची गती कमी झाली आहे. तसेच या मजुरांची नोंद कारखान्याकडे असल्याबाबतही खात्री करावी लागते. गतीने नोंदणी न झाल्यास योजनांचा लाभ मिळण्यास विलंब होणार आहे. नोंदणीची गती वाढवण्यासाठी राज्य स्तरावरूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे.

या सुविधा मिळणार
या योजनेतून ऊसतोड मजुरांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अंत्यविधी अर्थसाहाय्य योजना, जीवन व अपंगत्व विमा छत्र, आरोग्य व प्रसूती लाभ, वृद्धापकालीन संरक्षण, केंद्र शासन निर्धारित करेल असे इतर लाभ, भविष्य निर्वाह निधी, कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य योजना या योजनांव्यतिरिक्त शासनास वेळोवेळी व गरजेनुसार उपयुक्त वाटणार्‍या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.