Mon, Jun 01, 2020 18:27
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › सासरवाडीच्या लोकांकडून जावयास मारहाण

सासरवाडीच्या लोकांकडून जावयास मारहाण

Published On: Mar 20 2019 1:15AM | Last Updated: Mar 19 2019 11:46PM
अंबाजोगाई : प्रतिनिधी 

घरगुती भांडणातून पत्नीला माहेरी सोडण्यासाठी आलेल्या जावयास सासरवाडीतील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात वीट लागल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अंबाजोगाई शहरातील मोंढा भागात घडली.

गणेश लहू खोत (वय 22, रा. सावळेश्‍वर पैठण, ता. केज) असे जखमी तरुणाचे नाव आहे. व्यवसायाने टेम्पोचालक असलेल्या गणेशचे लग्न मागील वर्षी अंबाजोगाईतील तरुणीसोबत झाले होते. पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांत खटके उडू लागले. त्यामुळे मंगळवारी अंबाजोगाईच्या मोंढ्यातील आठवडी बाजारात भाजी घेऊन येतानाच त्याने पत्नीला माहेरी सोडण्यासाठी सोबत आणले. अंबाजोगाईत आल्यानंतर ते सर्वप्रथम मोंढ्यात गेले. त्याठिकाणी गणेशच्या पत्नीने फोन करून माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी लग्नात खर्च झालेला परत दे, असे म्हणत गणेशवर हल्ला चढविला. या हल्ल्यात गणेशच्या डोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला लातूरला हलविण्यात आले आहे. अंबाजोगाई शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.