Wed, Jun 19, 2019 08:58होमपेज › Marathwada › अंबाजोगाई (बीड) : भाविकांचे श्रद्धास्थान श्री योगेश्वरी मंदिर 

अंबाजोगाई (बीड) : भाविकांचे श्रद्धास्थान श्री योगेश्वरी मंदिर 

Published On: Oct 10 2018 11:57AM | Last Updated: Oct 10 2018 1:09PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचे मंदिर हे राज्यातील जागृत देवस्थान आहे. या देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक हजेरी लावतात. योगेश्वरी देवी अंबाजोगाईचे ग्रामदैवत आहे तर कोकणस्थांचे कुलदैवत आहे. मंदिराचा परिसर अतिशय नयनरम्य आहे. मंदिराच्या सभामंडपातील हेमाडपंथी स्थापत्य नजरेत भरण्याजोगे आहे. 

दसरा महोत्सवात व मार्गशीर्ष महिन्यात योगेश्वरी मंदिरात नऊ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. हजारो महिला व पुरुष भाविक भक्त दर्शनासाठी रांगा लावतात. या कालावधीत हजारो भाविक महिला नऊ दिवस मुक्कामासाठी थांबतात. तसेच भाद्रपद महिन्यातील नवरात्र महोत्सवात दररोज देवीची आरती करून देवीस दररोज नऊ रंगांच्या साड्यांचा पेहराव केला जातो. अभंग, भजन, कीर्तन, गायन या कार्यक्रमांनी  मंदिर परिसर भक्तिमय होऊन जातो. 

योगेश्वरी मंदिरास तीन दरवाजे आहेत. यादवकालीन शिलालेखानुसार या मंदिराला तीन मोठी शिखरे होती. योगेश्वरीचे हे पुरातन मंदिर असून साधारणतः दुसऱ्या ते तिसऱ्या शतकापासून या स्थळाला तीर्थक्षेत्र म्हणून लौकिक मिळाला असावा असे सांगितले जाते. नंतरच्या काळात अनेकदा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. यादवकाळात खोलेश्वराने या मंदिरास दान दिल्याचा शिलालेख आढळतो.

शिलालेखानुसार हे मंदिर मध्ययुगीन कालखंडापूर्वीचे आहे. सन १७२० मध्ये नागोजी त्रिमल आणि श्यामजी बापूजी या योगेश्वरी भक्तांनी मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद शासकीय दप्तरात सापडते .
मंदिराचा गाभारा ३.५ ×३.५ मीटर आकाराचा असून त्यात योगेश्वरी देवीचा अत्यंत आकर्षक मुखवटा आहे. 'सप्तशती' या प्राचीन ग्रंथांच्या मूर्तीरहस्य विभागात योगेश्वरी स्वरूपाचे अप्रतिम व वास्तविक वर्णन केलेले आहे. शेकडो वर्षांपासून चालू असलेल्या पूजेमुळे देवीच्या मूर्तीचे आजचे स्वरूप बदलले आहे. देवीचा तांदळा अतिशय प्रसन्न आहे. मंदिराचा मूळ गाभा ३ फूट रुंद व २ फूट उंच आहे.

ओंकार चबुतऱ्यावर उत्तराभिमुख असलेली ही मूर्ती तांदळ्याच्या स्वरूपात आहे. सभामंडपात केशवराज व योगेश्वरीची उत्सवमूर्ती आहे. उत्तर द्वारात होमकुंड आहे तर नगारखान्याजवळ दंत सूर्याची मूर्ती आहे. मंदिराभोवती सर्वेश्वर तीर्थ, मायमोक्षण तीर्थ असून कालभैरव, अग्री लेख, महारुद्र, गणेश व नारदेश्वराची मंदिरेही या मंदिर समूहात आहेत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये नवरात्र महोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर व विविध उपक्रमांनी संपन्न होतो. या नऊ दिवसांमध्ये अंदाजे १५ हजार महिला देवीचा नवस फेडण्यासाठी अत्यंत श्रद्धेने मुक्कामासाठी थांबतात.