Sun, Oct 20, 2019 11:45होमपेज › Marathwada › आदिशक्तीच्या मूळ पीठांपैकी एक माहूरची रेणुकामाता

आदिशक्तीच्या मूळ पीठांपैकी एक माहूरची रेणुकामाता

Published On: Oct 13 2018 7:27PM | Last Updated: Oct 13 2018 7:27PMनांदेड : महेश राजे

आदिशक्तीच्या साडेतीन मूळ पीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावर घटस्थापना झाली आहे. हे क्षेत्र मराठवाडा व विदर्भ यांच्या सीमेवरील हे शहर समुद्रसपाटीपासून ७५५ मीटर उंचावर आहे. महाराष्ट्रातील शक्तीपीठांमधील साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या रेणुकामातेचे हे स्थान म्हणून पवित्र मानले जाते. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांनी वेढलेले, पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले, हिरव्या वनराईने नटलेले हे शहर केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे... 

या शहराचा उल्लेख अभिलेखीय नोंदीमध्ये आढळून आला आहेत. नांदेडपासून माहूरचे अंतर १५० किलोमीटर एवढे आहे. माहूरमध्ये सापडलेल्या लेणींच्या आधारे या शहराचा इतिहास सातव्या शतकापर्यंत मागे जातो. यादवकाळात ते प्रशासकीय विभागाचे मुख्यालय होते. तर बहमनी काळात ते तरफ विभागाचे मुख्य ठिकाण होते. मोगल काळात ते सरकार विभागाचे मुख्यालय होते.

परशुराम व रेणुका यांच्याशी संबंधित अनेक प्रचलित कथा या ठिकाणाशी निगडीत आहेत. महानुभाव पंथाच्या दृष्टीनेही या स्थानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे स्थान दत्तात्रेयांचे जन्मस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. पर्यटनदृष्ट्याही हे शहर महत्त्वाचे असून इथे रामगडचा प्राचीन किल्ला, रेणुका माता मंदिर, दत्त शिखर, पुरातत्व वस्तुसंग्राहलय अशी अनेक धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळे आहेत.

रेणुकामाता मंदिराचा दैनंदिन नित्यक्रम येथील वंशपरंपरागत भोपींकडून केला जातो. त्यानुसार पहाटे देवीच्या मुखकमलावर शेंदूर लावला जातो. मंत्र पठण व सप्तशतीचे पाठ केले जातात. नंतर महावस्र अर्पण करुन पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. तसे देवीच्या मुखात तांबुल भरविला जातो. महाआरती केल्यानंतर गडावरील इतर मंदिरांमधील देव देवतांची पूजा केली जाते. याशिवाय मंदिरात गुढीपाडवा, नागपंचमी, पोळा, नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, मकरसंक्रांत असे विविध सण व उत्सव साजरे केले जातात. यापैकी पोळा या सणास विशेष महत्त्व आहे. 

नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत सुरु असतो. उत्सवाच्या पहिल्या दिवशी रानातील माती आणली जाते. विधीवत पूजा करुन तिच्यावर घट ठेवला जातो, कलशात पाणी असते. त्याच्या बाजूच्या मातीवर पाच प्रकारची धान्य विशेषत: गहू पेरला जातो. विड्याची पाने व नारळ ठेवला जातो. घटाच्या बाजूला पाच ऊस उभारुन फुलांची माळ चढविली जाते. तसेच प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तेल व तुपाचे दिवे तेवत ठेवले जातात. नऊही दिवस देवीस दहीभात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो व छबिना काढला जातो. या छबिन्याची देवीची आरती झाल्यानंतर ज्या पहाडावर रेणुका प्रकटली; त्या गडाला प्रदक्षिणा घालण्यात येते व त्याचे विसर्जन रेणुकादेवी मंदिरात होते. 
दसऱ्याच्या दिवशी परशुरामाची पालखी काढण्यात येते. देवीला तांबुल अर्पण केला जातो. येथे मिळणारा तांबुल हा इथले एक वैशिष्ट्य आहे. विड्याचे पान सुपारी, काथ, वेलदोडा, बडीशेप वगैरे घालून कुटललेला हा तांबुल बरेच दिवस टिकतो. पाच पानांपासून ते हजार पानांपर्यंत हा विडा तयार करुन देवीला अर्पण करण्याचा प्रघात आहे.

माहुरमधील मंदिरे...
रेणुकादेवी हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक असून याशिवाय माहूरमध्ये इतर अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये तुळजाभवानी, महालक्ष्मी, दत्तशिखर, श्री चिंतामणी, अनसूया माता, शरभंग ऋषी, महाकाली देवी, झंपटनाथ, जमदग्नी ऋषी, श्री सती मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री देवदेवेश्वर मंदिर, वनदेव मंदिर, विठ्ठल मंदिर, काशी विश्वेश्वर सोमदेव मंदिर, कपिलेश्वर मंदिर, पोचमाई मंदिर, हरिगीर मंदिर व अनेक मारुतीची मंदिरं आहेत. येथे नव्याने संस्थानाची स्थापना झाल्यापासून भौतिक विकासात लक्षणीय भर पडली आहे. भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने संस्थानाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. केंद्र सरकारच्या मेगा टुरिझम सर्किट या योजनेतही या शहराचा समावेश झाला होता;परंतु नंतर ही योजना बंद पडल्यात जमा आहे. पण, आता केंद्र सरकारच्यावतीने येथे रोप वे, लिफ्ट आदी सोयी उपलब्ध करण्याचे काम सुरु आहे.