Sun, May 31, 2020 02:04होमपेज › Marathwada › माणुसकीसाठी परळीकरांना रॅलीतून साद

माणुसकीसाठी परळीकरांना रॅलीतून साद

Published On: Jan 03 2019 12:34AM | Last Updated: Jan 02 2019 11:41PM
परळी : प्रतिनिधी

साद माणुसकीची फाउंडेशन  व  संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था, लिंबुटा (ता. परळी) यांच्या संयुक्त विद्यमाने सादग्राम निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी  प्रक्रियापूर्व जनजागृती करण्यासाठी परळी शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे परळीकरांना साद घालण्यात आली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

पुणे येथील साद माणुसकीची फौंडेशनचे संस्थापक हरिष बुटले व बंडुभाऊ आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी राज्यभरात  सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून सामाजिकता अभियान राबविण्यात येत आहे. यातील सहभागी संस्थांनी आपापल्या तालुक्यातून दोन गावे सादग्राम विकासासाठी दत्तक घेऊन तेथे एक गाव बारा उपक्रम राबवण्यात येणार आहेत, त्यात शिक्षण,आरोग्य, कौशल्य प्रशिक्षण व युवा संवाद, शेती व शेती पूरक व्यावसाय, पर्यावरण, प्रशिक्षण, शिबिरे, प्रबोधन, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, महिला सक्षमीकरण व बालकल्याण, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, वीज-रस्ते-पाणी, सामजिक समस्या निराकरण व नैसर्गिक आपत्ती निवारण यांचा समावेस आहे. यासाठी  अनिवासी ग्रामस्था, ग्रामस्थ, संस्था, शासन व इतर नागरिकांचा सहभाग आवश्क आहे. या सादग्रामसाठी परळी तालुक्यात दोन गावांची निवड करण्यात आली आहे. या अभियान संदर्भात जनजागृती करण्यासाठी परळी येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. सरस्वती शाळे पासून-महर्षी कनाद  शाळा, नाथ टॉकीज मार्गे  शिवाजी चौका पर्यंत रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महात्मा गांधीच्या वेशातील शुभम धोतरे या मुलाच्या हस्ते पुष्पहार आर्पण करण्यात आला. यानंतर रॅली परत शाळेत येऊन सांगता झाली. रॅलीत सादग्राम जिंदाबाद, माणसा माणसा जागा हो माणुसकीचा धागा हो,  गाव हमारी शान है, हम सबकी पहचान है...आदी घोषणा दिल्याने परिसर दणाणला.