Sun, May 31, 2020 03:43होमपेज › Marathwada › राहुल सोबतच गोकूळनेही केलाय कुस्तीत भीमपराक्रम 

राहुल सोबतच गोकूळनेही केलाय कुस्तीत भीमपराक्रम 

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 12:16AMपाटोदाः प्रतिनिधी

कुस्ती क्षेत्रात पाटोद्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार्‍या राहुल आवारे याच्याच पावलावर पाऊल टाकीत त्याचा लहान बंधू गोकूळ बाळासाहेब आवारे याची वाटचाल सुरू असून त्याने याच वर्षी झालेल्या 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान वेल्हा येथे झालेल्या अत्यंत मानाच्या अशा मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेत प्रतिस्पधी पैलवानांना आसमान दाखवत प्रथम मल्लसम्राट अजिंक्यवीर होण्याचा मान मिळविला होता.

राहुल प्रमाणेच गोकूळ आवारे यालाही लहानपणीपासूनच घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले, वडील बाळासाहेब आवारे हे स्वतःच पैलवान असल्याने त्यांनी आपले दोन्ही मुले राहुल व गोकूळ यांना लहानपणीपासूनच कुस्ती चे धडे देण्यास सुरुवात केली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुलांना काहीही कमी पडू न देता त्यांना सतत प्रोत्साहन दिले, त्याचेच फळ म्हणून राहुल आवारे याने थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेऊन कुस्ती क्षेत्रात मोठी उंची गाठली तर आपल्या भावाप्रमाणेच आता गोकूळ ही कुस्तीचे मैदान गाजवत असून त्याने आतापर्यंत खुल्या गटात अनेक ठिकाणी विजय मिळवत आपल्या गटात मुंबई महापौर केसरी स्पर्धा जिंकली आहे. 

तसेच महाराष्ट्र केसरी स्पधैचीही सेमीफायनल पर्यंत धडक मारून आपले कतृत्व सिद्ध केले आहे व भविष्यातील प्रकाशमान यशाच्या दिशा आत्ताच स्पष्ट केल्या आहेत. गोकूळ हा मागील काही वर्षंपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे या ठिकाणी वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करीत आहे.

 2 किलो चांदीची गदा व महिंद्राजीपचा मानकरी
वेल्हा येथे दिनांक 8 ते 10 फेब्रुवारी 2018 रोजी दरम्यान पार पडलेल्या मॅटवरील मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेत पाटोद्याचा. तुफानी मल्ल व आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचा पठ्ठा पै.गोकूळ आवारे हा अजिंक्यवीर ठरला होता, त्याने सोलापूर जिल्ह्याच्या पै.गणेश जगताप वर 6-4 गुणाने विजय मिळवला होता.

गोकूळ ला 2 किलो  चांदीची गदा, 8 लाख रु. किमतीची महिंद्रा जीप व प्रथम मल्लसम्राट किताबाने गौरवण्यात आले होते. महाराष्ट्र कुस्ती संघ आयोजित मेंगाई देवीच्या 371 व्या उत्सवानिमित्त वेल्हा येथे पार पडलेल्या मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र भरातून 550 पुरुष व 110 महिला मल्लांचा सहभाग झाला होता.

मॅटवरील नियमानुसार झालेल्या या स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर व आजवर झालेले सर्व महाराष्ट्र केसरी, ऑलिंपिक सहभागी मल्ल यासह नुकतेच महाराष्ट्र केसरी झालेले पै.अभिजित कटके,किरण भगत आदींचीही उपस्थिती होती.